दोन ठिकाणी पुराचे पाणी घुसले; पुढील दोन दिवस अतिवृष्टी
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
कोकणात धुवांधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. संगमेश्वरमधील गड नदीला आणि राजापूरमधील कोदवली नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी बाजारपेठेत घुसल्याने व्यापारी धास्तावले आहेत. दरम्यान, कोकणात दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने पुन्हा ज़ोर धरला आहे. रविवारी दिवसभर संततधार पाऊस सुरू होता. पावसामुळे रत्नागिरी शहरातील रस्ते चिखलमय झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसाने पुनरागमन केले. पावसाने पाठ फिरवल्याने शेतकरी चिंतेत होता. मात्र, पाऊस सुरू होताच शेतकर्यानी आनंद व्यक्त केला आहे. गेल्या 24 तासात 342 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गुहागर मध्ये 72 मिमी,रत्नागिरी 51 मिमी,संगमेश्वर 41 मिमी,राजापूरमध्ये 40 मिमी आणि लांजामध्ये 39 मिमी पावसाची नोंद झाली आहे.रत्नागिरी शहरात नळपाणी योजनेमुळे मोठ्या प्रमाणात खोदकाम करण्यात आल्याने पाऊस सुरू होताच रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य दिसत आहे. मुसळधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्याला चांगलेच झोडपून काढले आहे. त्यामुळे गडनदीला आलेल्या पुरामुळे माखजन बाजारपेठे पुराचे पाणी बाजारपेठेत शिरले होत. आधीच खाडीला भरती त्यात मुसळधार पाऊस त्यामुळे गडनदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाल्यामुळे माखजन बाजरपेठेत पुराचे पाणी शिरले होते.
राजापूरलादेखील मुसळधार पावसाचा फटका चांगलाच बसला आहे. मुसळधार पावसामुळे कोदवली नदीला पूर आल्याने राजापूरच्या जव्हार चौकात पाणी घुसले आहे. राजापूर तालुक्याला देखील मुसळधार पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. तसेच अर्जुना नदी देखील दुथडी भरून वाहत असल्याने नदी किनारच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.