। पोलादपूर । प्रतिनिधी ।
तालुक्यातील महाडलगतच्या ग्रामीण भागात सोमवारी सायंकाळी उशिरा झालेल्या वादळी वार्याने अनेक लोकवस्त्यांना जोरदार तडाखा दिल्याने आर्थिक हानी झाल्याचे दिसून आले. लोहारे, तुर्भे तसेच सवाद धारवली सप्तक्रोशी भागातील वावे याठिकाणी इमारतींचे नुकसान झाल्याचे तहसिल कार्यालयाकडून सांगण्यात आले. सुदैवाने कोठेही मनुष्यजीवित हानी झाली नाही. पोलादपूर तालुक्यात सोमवारी संध्याकाळी उशिरा अचानक ढग दाटून येऊन सोसाटयाचा वारा सुटला आणि वादळी वार्याने धुळीचे लोट मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या काँक्रीटच्या रस्त्यावरून उधळले गेले. याचदरम्यान, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत शेलार ढाब्याच्या नवीन आकर्षक इमारतीची एक भिंत वादळी वार्याचा प्रवाह वाढल्याने कोसळली. यावेळी हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या तीन मोटारसायकलींवर भिंतीतील जांभा दगड पडल्याने मोटारसायकलींची हानी झाली. यावेळी तुर्भे बुद्रुक भिकू गणपत पवार यांचे राहते घराचे पत्रे वादळी वार्यामुळे उडाले तर तुर्भे बुद्रुक मंदिर पत्र्याचे नुकसान झाले. सवाद धारवली सप्तक्रोशी विभागातही वावे गावात घराचे पत्रे उडाल्याच्या घटनांनी अनेकांचे आर्थिक नुकसान ओढवले आहे. पोलादपूर तहसिल कार्यालयातून देण्यात आलेल्या माहितीनुसार तालुक्यात वादळीवार्यामुळे घरे व इमारतींचे नुकसान झाले असले तरी कोठेही मनुष्याला इजा अथवा जिविताची हानी झाली नसल्याचे सांगण्यात आले.