संघर्ष होतो पण मर्यादा पाळा; शरद पवार यांचा सल्ला

| मुंबई | प्रतिनिधी |

संघर्ष होतो, पण त्याच बरोबरच जबाबदार व्यक्तींनी मर्यादा पाळल्या पाहिजेत. आपण महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेचे प्रमुख आहोत, याचे भान राखा, असा वडिलकीचा सल्ला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने सध्या ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार शक्तीप्रदर्शन, आरोप, प्रत्यारोप सुरु झालेले आहेत. यामुळे कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्‍नही निर्माण झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर शिंदे यांना सबुरीचा सल्ला पवारांनी दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कटूता पसरेल असं काही करु नये अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त करुन दिली. तसेच ते एका पक्षाचे नेते नसून 14 कोटी महाराष्ट्रातील जनतेचं प्रतिनिधित्व करतात. राज्याचे जे जबाबदार लोक आहेत, त्या लोकांनी हे वातावरण दुरुस्त करायला पावलं टाकली पाहिजे आणि मग ती पावलं टाकण्याची जबाबदारी ही आमच्यासारख्या वरिष्ठ लोकांकडे असेल. त्याहीपेक्षा ते राज्याचे प्रमुख आहेत. ते पक्षाचे प्रमुख असतील पण महाराष्ट्राच्या 14 कोटी लोकांचे ते प्रमुख आहेत. त्यामुळे त्यांच्यावर ही जबाबदारी अधिक आहे, असं पवार म्हणाले.

तसेच दसरा मेळाव्याच्या पार्श्‍वभूमीवर, अपेक्षा अशी करूयात की यामधून शेवटी जी काही मुख्यमंत्री शिंदे आणि उद्धव ठाकरे मांडणी मांडतील, त्यात कटूता नसेल अशाप्रकारची मांडणी दोन्ही बाजूंनी केली तर राज्यातील वातावरण सुधारायला मदत होईल, अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.

अंधेरी पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीची ताकद आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या पाठीमागे उभी करु, तशी आमच्या पक्षाची भूमिका आहे.

शरद पवार,राष्ट्रवादी अध्यक्ष
Exit mobile version