दिबांच्या नामकरणाचा लढा दिल्लीत

जंतर-मंतरवर भूमिपुत्रांचा एल्गार

| खांदा कॉलनी | प्रतिनिधी |

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेला लढा आता थेट देशाची राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. विमानतळाच्या नामकरणाचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने केंद्र सरकारकडे पाठविल्याचे सांगितले जात असताना, अंतिम मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या भूमिपुत्रांनी दि.5 ऑगस्ट रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

या आंदोलनात नवी मुंबई, पनवेल, उरण, रायगड परिसरातील शेतकरी, प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्र मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. विमानतळ उभारणीसाठी हजारो कुटुंबांनी आपल्या जमिनी दिल्या असून, त्या त्यागाचा सन्मान म्हणून लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्यात यावे, अशी त्यांची ठाम मागणी आहे. आंदोलनकर्त्यांच्या मते, राज्य सरकारकडील आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाली असून, प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे आता अंतिम निर्णय घेण्याची जबाबदारी केंद्र सरकारची असल्याचे त्यांनी नमूद केले. दरम्यान, “चलो दिल्ली, चलो जंतर-मंतर” अशी घोषणा देत भूमिपुत्रांनी राजधानीत आपला आवाज बुलंद करण्याची तयारी सुरू केली आहे. “राज्य सरकारने प्रस्ताव पाठवला, आता केंद्र सरकार निर्णय कधी घेणार?” असा सवालही आंदोलनकर्त्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे भूमिपुत्रांनी दि.5 ऑगस्ट रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असून, भूमिपुत्रांच्या अस्मितेशी जोडल्या गेलेल्या या प्रश्नावर आता दिल्लीत निर्णायक संघर्ष होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे या आंदोलनाकडे नवी मुंबईसह संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. तसेच, विमानतळाच्या नामकरणाच्या प्रश्नावर केंद्र सरकार काय भूमिका घेते, याकडे देखील सर्वांचे लक्ष राहणार आहे.

Exit mobile version