। रसायनी । वार्ताहर ।
कोरोना काळात होत्याचे नव्हते झाल्याने कुटुंबाची गुजराण करण्यासाठी काहीतरी करावेच लागेल. या विचाराने सैरावैरा झालेल्या मोहन दत्तू ताकमोगे यांनी मोहोपाडा मुख्य बाजारपेठेतील शिवाजी चौकात टोमॅटो व्यवसाय सुरू करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू केला. काही दिवसांत टोमॅटो व्यवसाय वाढवून ते चांगले कमाई करु लागले.
सर्वसामान्य गरीब जनता केंद्रीय अर्थसंकल्पाच्या स्फोटाने, कानाने बहिरी, तोंडाने मुकी आणि डोळे असूनही आंधळी झाली आहे. जनतेला जीवनावश्यक वस्तू कुवतीबाहेरच्या वाटू लागल्या आहेत. त्यातच कोरोनासारखी महामारी, निसर्गात होणार्या बदलामुळे उद्भवलेली परिस्थिती यामुळे हातावर पोट भरणार्यांची बिकट अवस्था झाली आहे.
गरिबीचे संकट आल्यावर शांत न बसता काहीतरी व्यवसाय करावा, त्यातून नक्कीच फायदा होईल. नोकरी न मिळाल्यास घरी बसून न राहता काहीना काही प्रयत्न करीत राहावे, असे तरुण पिढीला मोहन ताकमोगे यांनी आवाहन केले आहे.