। कल्याण । प्रतिनिधी ।
कल्याण पश्चिमेत बिर्ला महाविद्यालयाजवळ बुधवारी (दि. 30) दुपारच्या सुमारास महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या मागील चाकाखाली येऊन दुचाकीवरील एक तरूण चिरडला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अमनकुमार दुबे (17) असे अपघातातील मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो बिर्ला महाविद्यालयाचा विद्यार्थी होता.
बुधवारी दुपारी महाविद्यालय सुटल्यानंतर अमनकुमार दुबे दुचाकीवरून आपल्या घरी निघाला होता. बिर्ला महाविद्यालयासमोरील मुंबई-मुरबाड-अहिल्यानगर रस्त्यावरून जात असताना अमनकुमार दुबे एका एसटी बसच्या समांतर दुचाकी चालवित होता. अचानक अमनकुमारचा दुचाकीसह तोल गेला आणि तो बसच्या मागच्या चाकाखाली आला. अशी प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेनंतर इतर वाहन चालक आणि पादचाऱ्यांनी आरडाओरड केली असता चालकाने जागीच बस थांबवली. मागच्या चाकाखाली आल्याने अमनकुमार गंभीर स्थितीत होता. त्याला तातडीने गस्तीवरील वाहतूक पोलिसांनी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून जवळच्या रुग्णालयात नेले. नंतर त्याला पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात नेले. मात्र, गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.