| नालासोपारा | प्रतिनिधी |
बाल दिनाचा उत्साह संपत नाही तोवर एका बालिकेचा मनाला चटका लावणारा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. वसई पूर्वतील सातिवली येथील श्री हनुमंत विद्यामंदिर शाळेत 10 मिनिटे उशिरा आल्याने शिक्षिकेने दिलेल्या 100 उठाबशांच्या शिक्षेमुळे तब्येत बिघडून एका 13 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याने समाजमन सुन्न झाले आहे.
काजल गौड असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, ती इयत्ता 6 वीच्या वर्गात शिकत होती. 8 नोव्हेंबर रोजी अनेक विद्यार्थी शाळेत उशिरा पोहोचले होते. त्यात काजलचाही समावेश होता. शिक्षकांनी थेट 100 उठाबशा काढा, अशी कठोर शिक्षा दिली. काही विद्यार्थ्यांना दप्तर खांद्यावर घेऊनच उठाबशा काढण्यास सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शाळेतून परतताच काजलची तब्येत अचानक बिघडू लागली. कुटुंबीयांनी तिला तातडीने आस्था हॉस्पिटलमध्ये दाखल केले. नंतर अन्य दोन हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने तिला मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच बाल दिनाच्या दिवशीच शुक्रवारी रात्री 11 वाजता काजलचा मृत्यू झाला. काजलच्या कुटुंबीयांनी शाळा व्यवस्थापन व शिक्षकांवर गंभीर आरोप केले आहेत. शाळेच्या निष्काळजीपणामुळेच आमची मुलगी गेली. जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी कुटुंबीयांसह स्थानिक नागरिकांनी केली.
ही घटना उघडकीस आल्यानंतर वालीव पोलिसांनी शाळा आणि संबंधित रुग्णालयांना भेट देऊन तपास सुरू केला आहे. दरम्यान, ही घटना पालकांमध्ये चिंता निर्माण करणारी ठरली आहे. शाळेत शिस्त राखण्यासाठी दिल्या जाणाऱ्या शिक्षेचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर किती गंभीर परिणाम होऊ शकतो, हे या घटनेमुळे अधोरेखित होत आहे. या प्रकरणावर स्थानिक नागरिकांकडून शिक्षकांवर कठोर कारवाईची मागणी होत असून, वसई-विरारमध्ये संतापाची लाट पसरली आहे.





