| मुंबई | प्रतिनिधी |
मुंबईतील मालाड पश्चिम येथे एका अल्पवयीन मुलीवर रिक्षाचालकाने विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. सोमवारी (दि.8) एक 17 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनी कॉलेज संपल्यानंतर दुपारी 4.30 च्या सुमारास मालाड येथील एस.व्ही. रोडवर ऑटोरिक्षा शोधत होती. यावेळी एक रिक्षाचालक तिथे येताच विद्यार्थिनीने चालकाला सुराणा हॉस्पिटल, ओरलेम, मालाड पश्चिमेला घेऊन जाण्यास सांगितले. तरुणीने सांगितलेल्या मार्गाने तो न जाता वेगळ्या मार्गाने गाडी चालवत होता. तसेच रिक्षाचालकाने आरशातून विद्यार्थिनीकडे पाहून तिला अनेकदा अश्लील हावभाव केले. या घटनेमुळे विद्यार्थिनी घाबरल्यामुळे तिने रिक्षा थांबवण्यास सांगितले. मात्र त्याऐवजी, त्यानेक रिक्षाचालकाने वेग वाढवला. घाबरून ती ओरडू लागली, परंतु त्याने तिला धमकी दिली. थोड्या शांततेनंतर, ती पुन्हा ओरडली. यावेळी, त्याने तिला ऑटोरिक्षातून बाहेर ढकलले. यानंतर विद्यार्थिनीने आई आणि बहिणीसह मालाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. केशव यादव (54) असे आरोपी रिक्षा चालकाचे नाव आहे.
रिक्षाचालकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
