| मुंबई | प्रतिनिधी |
तेरा वर्षांच्या मुलीशी अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना कांदिवलीतील एका शाळेत उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध कांदिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कांदिवली परिसरात राहणारी ही मुलगी जवळच असलेल्या एका शाळेत शिकते. जुलै महिन्यांच्या शेवटच्या आठवड्यात शाळेत असताना तिच्याशी शाळेतील शिक्षकाने अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केला. बदनामीच्या भीतीने तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. अलीकडेच तिने घडलेला प्रकार शाळेच्या मुख्याधापिकेला सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मुख्याधापिकेने कांदिवली पोलीस ठाण्यात आरोपी शिक्षकाविरुद्ध तक्रार केली. या तक्रारीनंतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी विनयभंगासह पोक्सो कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच या शिक्षकाला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविले जाणार आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी उघडकीस आलेल्या या घटनेने शाळेतील शिक्षक, पालकासह विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.