। ठाणे । प्रतिनिधी ।
बदलापुरमधील एका खाजगी शाळेतून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. इयत्ता सातवीमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा एका शिक्षकाने विनयभंग केला आहे. याप्रकरणी संबंधित शिक्षकावर बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
बदलापुरमधील एका खाजगी शाळेत हा प्रकार घडला असून संबंधित शिक्षक पीडित मुलीला गेल्या तीन वर्षांपासून त्रास देत होता. याआधी हा प्रकार इतका गंभीर नसावा असा विचार करुन, मुलीच्या आईने शाळेत जाऊन संबंधित प्रकार शाळेच्या निदर्शनास आणून दिला. मात्र, यांनतरसुद्धा या विकृत शिक्षकाने मुलीसोबत गैरकृत्य सुरुच ठेवले. तसेच, अश्लील वर्तन करत, संभाषण केले. एवढ्यावरच न थांबता या शिक्षकाने पीडित मुलीच्या आईबाबतदेखील अश्लील टिप्पणी केली. त्यानंतर मुलीने घाबरून हा सगळा प्रकार आपल्या आईला सांगितला. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात शिक्षकाविरोधात तक्रार केली असता पोलिसांनी विकृत चाळे करणाऱ्या शिक्षकाला ताब्यात घेतले आहे.