। पनवेल । प्रतिनिधी ।
पनवेल-सीएसएमटी ट्रेनच्या महिलांच्या डब्यात प्रवेश करुन एका 18 वर्षांच्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीला धावत्या ट्रेनमधून खाली ढकलल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. श्वेता महाडिक असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. गंभीर जखमी झालेल्या श्वेताच्या जबानीनंतर रेल्वे पोलिसांनी शेख अख्तर नवाज नावाच्या आरोपीला अटक केली आहे.
श्वेता तिच्या मैत्रीणीसह खारघर येथील महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली होती. दोघींनी पनवेल स्थानकावर पनवेल-सीएसएमटी लोकल पकडली. दोघीही लोकलच्या महिलांच्या डब्यात चढल्या. त्याचवेळी आरोपी शेखही महिलांच्या डब्यात शिरला. तेव्हा इतर महिलांनी त्याला डब्यातून खाली उतरण्यास सांगितले असता चिडलेल्या शेखने डब्याच्या दरवाजाजवळ उभ्या असलेल्या श्वेताला धावत्या ट्रेनमधून खाली ढकलले. श्वेता ट्रेनमधून खाली पडताच महिला प्रवाशांनी तात्काळ ट्रेनची चेन खेचून रेल्वे हेल्पलाइन क्रमांकावर माहिती दिली. यानंतर लोकल खांदेश्वर स्थानकात येताच जीआरपी पोलिसांनी शेखला ताब्यात घेतले. खाली पडलेल्या श्वेताच्या डोक्याला, कंबरेला आणि हाता-पायाला गंभीर जखमा झाल्याने तिला तात्काळ कळंबोली येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.







