नियम धाब्यावर बसवून विद्यार्थी वाहतूक सुरू

परीवहन कार्यालयाच्या निरीक्षकांचे दुर्लक्ष
| महाड । प्रतिनिधी ।
शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्‍या बसला विविध ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्यानंतर महाराष्टा्त सर्वत्र विद्यार्थ्यांच्या वाहनांना कडक नियमावली घालून देण्यात आली. मात्र ही नियमावली कागदावरच अधिक प्रभावीपणे दिसून येत असून नियम धाब्यावर बसवून आजही खुलेआम विद्यार्थांची वाहतुक सुरूच आहे. याला प्रशासनाबरोबर मुलांचे पालकही तितकेच जबाबदार आहेत. महाराष्ट्र परीवहन विभाग कार्यालयाकडून नेमण्यात आलेले निरीक्षकांचे देखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याने या अपघातामध्ये वाढ होत आहे.

राज्यात सर्वत्र स्कूलबस नियमावली बनवण्यात आली असली तरी मुलांच्या सुरक्षेबाबत प्रशासन आणि पालक देखील गांभीर्‍याने घेत नसल्याचे दिसून येते. अनेक सुशीक्षीत पालक देखील आपल्या कोवळया जिवांना कोंबूनच रिक्षा अगर मॅक्झीमो सारख्या छोटया गाडयांमधूनच प्रवास करावयास लावत असल्याचे चित्र शहरात रोज पहाटे पहावयास मिळत आहे. पहाटे उठून शाळेचा रस्ता धरणा-या छोटया छोटया विद्यार्थ्यांना अनेक भंगार स्कूल बसमधूनच प्रवास करावा लागत आहे. आधीच खराब असलेल्या या रस्त्यांवर भल्या भल्यांचे कंबरडे मोडते तिथे छोटया मुलांचे काय असा प्रश्‍न पडणे स्वाभावीकच आहे. तरी देखील पालक आपल्या मुलांना अशा गाडयांमधून प्रवास करावयास भाग पडतात हे वास्तव आहे. महाराष्ट्रात अनेक वेळा स्कूल बसना अपघात झाल्याच्या घटना घडल्यानंतर स्कूलबस नियमावली कडक केली खरी पण ही नियमावली कागदारच राहीली आहे.

महाडसारख्या ठिकाणी देखील स्कूलबसना अपघात झाल्याच्या किरकोळ घटना घडून देखील याकडे गांभीर्याने घेतलेले नाही. शहरात बहुतांश शाळांमध्ये स्कूल बसेस सेवा लागू आहे. अनेक शाळांमध्ये पिवळया रंगाच्या खाजगी बसेस आहेत मात्र या बसेस म्हणजे जुन्याच गाडयांना नवीन मेकअप केल्याचा प्रकार आहे. तर अनेक शाळांमध्ये मॅक्झीमो, टाटा मिनीबस, जिप अशा वाहनांना काचेवर स्कूलबसचा स्टीकर लावून व्यवसाय केला जात आहे. या गाडयांमधून मेंढर कोंबून नेल्याप्रमाणे मुलांना भरले जाते आणि वाहतूक केली जात आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहेच परंतू पालक देखील याकडे कानाडोळा करून आहेत. शाळा देखील आता पालकांची जबाबदारी लिहून घेत आपले हात वर करत आहेत.

पालकांची उदासिनता
आपल्या पाल्याला शाळेत पाठवण्यासाठी शाळा वापरत असलेली बस योग्य आहे का याची साधी विचारणा देखील केली जात नाही. शाळेत प्रवेश घेण्यापूर्वीच अनेक शाळा बसेसचे शुल्क वसूल करतात. अनेक पालक रिक्षा, छोटया बस, अशा विविध मार्गाने आपल्या पाल्याला शाळेत पाठवतात. याकरीता चांगले पैसेही मोजतात मात्र मुलांना कशा प्रकारे गाडयांतून कोंबले जाते याबाबत साधा जाब देखील पालक विचारताना दिसून येत नाही. यारून पालक आपल्या पाल्याबाबत किती जागरूक आहेत हे दिसून येते. एखादा अपघात झाल्यानंतर मात्र हेच पालक प्रशासनावर आग पाखड करताना दिसतात.

Exit mobile version