अन्न व औषध प्रशासनासह पोलिसांचे दुर्लक्ष
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन शहरासह संपूर्ण तालुक्यामध्ये गुटख्याची अवैध विक्री जोरदारपणे पुन्हा एकदा सुरू झाली आहे. मात्र, गुटखा या पदार्थावर महाराष्ट्र राज्यात बंदी असताना सुद्धा त्याची खुलेआम विक्री होत असून, देखील अन्न व औषध प्रशासन व पोलीस प्रशासन या गोष्टीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे.
रायगडच्या पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नवनियुक्त पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी अवैध धंदे करणाऱ्यांचे चांगलेच कंबरडे मोडले होते. परंतु, आता काही दिवस उलटून गेल्यानंतर श्रीवर्धन तालुक्यामध्ये पुन्हा एकदा गुटख्याची जोरदार विक्री सुरू झाली आहे. काही दिवसापूर्वी श्रीवर्धन पोलिसांनी एका गुटखा विक्रेत्यावरती धाड टाकून अंदाजे 98 हजार रुपयाचा गुटखा जप्त केला होता. त्यानंतर श्रीवर्धन शहरात व तालुक्यामध्ये गुटखा विक्री अनेक दिवस बंद होती. परंतु, पुन्हा एकदा गुटखा विक्री जोरात सुरू झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अवैध गुटखा विक्री करणारे सध्या ट्रॅव्हल्स बसेस किंवा ट्रान्सपोर्ट घेऊन येणाऱ्या मालट्रक मधून गुटखा मागवत असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. सदरचा गुटखा शहराच्या बाहेर जाऊन ताब्यात घेतल्यानंतर रात्रीच्या वेळी व पहाटे लवकर सर्व विक्रेत्यांना पुरविला जातो. अशी देखील माहिती उपलब्ध झाली आहे. गुटखा सर्रासपणे सर्वत्र मिळू लागल्यामुळे अनेक महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थी देखील या गुटख्याच्या व्यसनाधीन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी रायगडच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी सदर गुटखा विक्री करणाऱ्यांवरती कडक कारवाई करावी. अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.







