झुगरेवाडी शाळेत विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे

| नेरळ | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील उपक्रमशील शाळा असणाऱ्या झुगरेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत नवीन वर्षाचे औचित्य साधून अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. आदिवासी विद्यार्थी शिकत असलेल्या या शाळेत विद्यार्थ्यांचे वाढदिवस शाळेत साजरे करण्याची प्रथा पाडण्यात आली आहे.

रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी हे वंचित व गरीब कुटुंबातील आहेत, काही विद्यार्थ्यांचे पालक वीटभट्टीवर तर काहींचे पालक मिळेल ती मोल मजुरी करून आपला चरितार्थ भागविणारी आहेत. त्यात अशा परिस्थितीत आपल्या मुलाचे वाढदिवस साजरा करणे ही फार दुर्लभ बाब. हीच बाब मुख्याध्यापक व शिक्षक यांच्या निदर्शनास आली आहे. पालकांसोबत विचार विनिमय करून आपल्या विद्यार्थ्यांना या आनंदापासून वंचित ठेवायचे नाही असा संकल्प केला याची सुरुवात आज एक जानेवारी रोजी वाढदिवस असणाऱ्या रोहिणा वाघ, दीपिका झुगरे, वेदिका झुगरे, सोमनाथ वाघ या विद्यार्थ्यांना सुखद धक्का दिला. आजच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून, केक कापून व खाऊ वाटप करून साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना अशा प्रकारे अनपेक्षित सुखद अनुभव मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता. या पुढील काळात सर्व विद्यार्थ्यांचे वाढदिवस आनंदाने व उत्साहाने शिक्षकांच्या माध्यमातून साजरे केले जातील, असे धोरण शाळेने ठरवले आहे.

Exit mobile version