। नेरळ । प्रतिनिधी ।
हुतात्मा भाई कोतवाल यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे बलिदान झालेल्या स्थानाची स्वच्छता विद्यार्थ्यांनी केली. त्यावेळी सिद्धगड हुतात्मा स्मारक परिसर स्वच्छता आणि विद्यार्थांना अभ्यास मोहीम आयोजित करण्यात आली होती.
राजा शिवछत्रपती परिवार अंतर्गत रायगड विभाग परिवाराने हुतात्मा भाई कोतवाल यांच्या जयंतीनिमित्त महुतात्मा स्मारक सिद्धगड स्वच्छता आणि गडकिल्ले भटकंती अभ्यास मोहीम आयोजित केली होती. या स्वच्छता मोहिमेत 94 सभासदांनी सहभाग नोंदवला. रायगड विभाग प्रमुख निलेश ठोंबरे आणि उपविभाग प्रमुख समीर विरले तसेच रायगड विभाग परिवार अष्टप्रधान मंडळ यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले. यावेळी हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील आणि हुतात्मा विठ्ठल लक्ष्मण कोतवाल यांच्या प्रेरणादायी जीवनचरित्रावर गिरीश कंटे यांनी व्याख्यान दिले. त्यावेळी भगवान शेळके, दिलीप खाटेघरे, तसेच वनरक्षक अधिकारी जयवंत मार्के यांची उपस्थिती होती. हुतात्मा स्मारकाच्या परिसराची स्वच्छता केली. रायगड विभागातील वरिष्ठांनी राजा शिवछत्रपती परिवार गडकोट आणि ऐतिहासिक स्थळांच्या संवर्धनासाठी करत असलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच ऐतिहासिक वारसा यांच्या जपणुकीचे आवाहन केले.







