पाचवीतील वैदहीचा आदर्श कित्ता
| पनवेल | वार्ताहर |
आपल्या आई-वडिलांकडून वेगवेगळे शालेय साहित्य, त्याचबरोबर खाऊसाठी पैसे मिळावे यासाठी मुलं हट्ट करतात. तो त्यांचा दोष नसतो, तर त्यांचे वय हे खेळण्या-बागडण्याचे असते. मात्र, करंजाडे येथील रहिवासी असणार्या वैदही विक्रम मोरे ही पाचवीतील विद्यार्थिनी शिव व्याख्यान सर्वत्र देत आहे. या मुलीने आपल्या मानधनातील काही रक्कम आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाच्या इमारतीच्या दुरुस्तीकरिता शिक्षकांकडे सपूर्द केली आहे. या माध्यमातून वैदेहीने एक प्रकारे आदर्शाचा कित्ता गिरवला आहे.
शाळा ही गावची प्रतिकृती असते आणि शिक्षक ही त्या शाळेची प्रतिकृती असते. विद्यार्थी शिक्षकांची प्रतिकृती समजली जाते. कारण, या मूलरूपी गोळ्यांना घडवण्याचे तसेच आकार आणि वळण देण्याचे काम हे शिक्षक करतात. आदर्श पिढी घडवण्यात शाळेचा खूप मोठा वाटा असतो. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपली संस्कृती जपण्याच्या उद्देशाने अनेक शाळांमध्ये शिकवण दिली जाते. त्यामध्ये महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या नवीन पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके विद्यालयाचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल.
सध्या शिक्षणाचे व्यापारीकरण व बाजारीकरण झाले आहे. खासगी शाळांमधून मोठ्या प्रमाणात शुल्क वसूल केले जाते. परंतु, त्याला नवीन पनवेल येथील फडके विद्यालय अपवाद आहे. संस्कारक्षम पिढी घडवण्याचे काम या शाळेतून केले जाते. त्याचबरोबर दर्जेदार शिक्षणासाठी ही शाळा सर्वपरिचित आहे. इयत्ता पाचवी शिकणारी वैदही विक्रम मोरे ही लहानगी विद्यार्थिनी शिवव्याख्याती म्हणून ओळखली जाते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यावर ती प्रबोधन करते. आतापर्यंत अनेक ठिकाणी तिने या विषयावर व्याख्यान केले आहे. त्यासाठी वेगवेगळ्या सामाजिक संस्था आणि आयोजकांकडून फुल ना फुलाची पाकळी म्हणून तिला मानधन दिले जाते. त्यातून आपल्या शाळेच्या दुरुस्तीकरिता वैदहीने काही रक्कम नुकतीच शिक्षकांकडे सुपूर्द केली आहे.