प्रत्यक्ष मतदानाचा विद्यार्थ्यांना अनुभव

| उरण | वार्ताहर |

विद्यार्थ्यांकडे भावी सुज्ञ नागरिक म्हणून पाहिले जाते. आज ना उद्या हे विद्यार्थी भावी मतदार होणार आहेत. त्यामुळे मतदानाचा प्रत्यक्ष अनुभव देणारा नावीन्यपूर्ण उपक्रम रायगड जिल्हा परिषदेच्या उरण तालुक्यातील सारडे शाळेने राबवला आहे.

उरण तालुक्यातील सारडेतील रायगड जिल्हा परिषदेची शाळा नेहमीच विविध उपक्रमांमुळे चर्चेत आहे. नुकताच इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मतदानाचा अनुभव मिळवा म्हणून शाळेने अभिरूप मतदानाचा उपक्रम राबवला आहे. दोन दिवस अगोदर या या उपक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली होती. शाळेच्या माध्यमातून प्रत्यक्ष मतदान कक्षाची मांडणी करण्यात आली. त्यात मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी, शिपाई, हवालदार व मतदान प्रतिनिधी झोनल ऑफिसर नेमले गेले. पूर्ण मतदान कक्षाची निर्मिती केली. तर शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय मुख्यमंत्री व स्वच्छता मंत्र्यांसाठी उमेदवार म्हणून उभे केले. मतदानाची चिन्हे तसेच उमेदवारांना प्रचारासाठी एक दिवसही दिला गेला. तर मतदान केंद्रातील बॅलेट मशिन, कंट्रोल युनिटच्या साहाय्याने मुलांनी प्रत्यक्ष मतदान केले.

निवडणुकीसाठी फक्त 30 रुपयांचा खर्च
विद्यार्थ्यांनी हे अभिरूप मतदान अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडले. यावेळी लकी म्हात्रे हा प्रचंड मत मिळवून शालेय मुख्यमंत्री म्हणून निवडून आला तर मानस म्हात्रे हा विद्यार्थी स्वछतामंत्री म्हणून निवडून आला. निवडणुकीचा निकाल लागताच विद्यार्थ्यांनी ढोल-ताशा, लेझीमच्या गजरात तसेच फटाक्यांची आतषबाजीत जल्लोष साजरा केला. मतदानाची प्रक्रिया मोबाईलद्वारेच करण्यात आली, त्यामुळे निवडणुकीसाठी फक्त 30 रुपयांचा खर्च आला होता. त्यामुळे मतदान प्रक्रियेवर होणारा कोट्यवधींचा खर्चाबाबत उपक्रमातून भाष्य केले.
Exit mobile version