| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यातील वनवासी कल्याण आश्रम संचलित आश्रमशाळा, माणगाव येथील विद्यार्थ्यांचे वार्षिक वनभोजन बुधवारी (दि.21) रोजी उत्साहात पार पडले. भादाव गावाच्या हद्दीत काळ नदीच्या काठावर असलेल्या रम्य वनराईत हे वनभोजन आयोजित करण्यात आले होते.
इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे पाच गट तयार करण्यात आले होते. प्रत्येक गटाने स्वतः विविध प्रकारचे पदार्थ तयार करून खाण्याचा मनमुराद आनंद लुटला. विद्यार्थ्यांनी भाज्या, मासे तसेच चिकनचे विविध रुचकर पदार्थ बनवण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. यामुळे स्वयंपाक कौशल्य, संघभावना व स्वावलंबनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झाली.
वनभोजनादरम्यान विद्यार्थ्यांनी गाणी, गोष्टी, खेळ आणि विविध मनोरंजनात्मक उपक्रम सादर करून कार्यक्रमात अधिक रंगत आणली. निसर्गाच्या सान्निध्यात शिक्षणासोबत आनंद, सहकार्य आणि सांस्कृतिक जाणीव यांचा सुरेख संगम अनुभवायला मिळाला. या वनभोजनात आश्रमशाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच प्रकल्प अधिकारी कार्यालयातील फसाळे, निवाते, संस्थेचे रावसाहेब सोनवणे, नितीन चांदोरकर, प्रतिभा पोळेकर, वसंत पोळेकर, विजय शिंदे, उत्तम पाटील, अरुण पाटील आदी मान्यवरांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना निसर्गाशी नाते जोडण्याची, सहजीवनाची व प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची अमूल्य संधी मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
आश्रमशाळेचे वनभोजन उत्साहात

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606