। पाली-बेणसे । वार्ताहर ।
नागोठणे येथील रिलायन्स कंपनी क्षेत्रालगत असलेल्या रिलायन्स फाउंडेशन स्कुलमध्ये बेणसे झोतिरपाडा हद्दीमधील मुलांना प्रवेश मिळून त्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी प्रकल्पबाधित स्थानिक संघर्ष समितीच्यावतीने केलेल्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. प्रवेशापासून वंचित असलेल्या असंख्य मुलांना स्कुलमध्ये प्रवेश मिळाल्याने पालक वर्ग तसेच विभागातील जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच बेणसे झोतिरपाडा प्रकल्पबाधित स्थानिक संघर्ष समितीचे देखील सर्व स्थरातून अभिनंदन करून आभार मानले जात आहेत.
प्रकल्पबाधित स्थानिक संघर्ष समितीच्यावतीने दि. 19 जुलै रोजी बेणसे झोतिरपाडा या दोन ग्रामपंचायत हद्दीमधील मुलांना शाळेमध्ये प्रवेश मिळण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांच्यासोबत पत्रव्यवहार करून निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने मंगळवारी (दि.6) रिलायन्स प्रेसिडेंट गौतम मुखर्जी व इस्टेट मॅनेजर अजिंक्य पाटील यांच्या सहकार्याने मुलांचे रिलायन्स फाउंडेशन शाळेमध्ये प्रवेश निश्चित झाल्याचे रिलायन्स प्रशासनाने कळविले आहे. या बद्दल बेणसे झोतिरपाडा प्रकल्पबाधित स्थानिक संघर्ष समितीच्यावतीने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड प्रशासनाचे आभार मानले आहेत.