कर्जतच्या संशोधन केंद्रातील भेट ठरली अस्मरणीय
। अलिबाग । प्रतिनिधी ।
मुंबईमधील मालाड येथील उत्कर्ष मंदिर शाळेतील दहावीमधील दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी कर्जतच्या प्रादेशिक कृषी संशोधन केंद्राला नुकतीच भेट दिली आहे. विद्यार्थी व शास्त्रज्ञ यांच्यामध्ये सुसंवाद झाला. यावेळी विद्यार्थ्यांना शेतीचे महत्व, फायदे याची माहिती देत त्यांना शेतीविषयक धडे देण्यात आले. ही भेट या विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरली आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे तसेच डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य विनायक काशिद यांच्या प्रेरणेने अभ्यास दौरा रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रात काढण्यात आला होता. यामध्ये शाळेतील 216 विद्यार्थी सहभागी झाले होते.
यावेळी डॉ. बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. प्रकाश शिनगारे , उद्योजक विनायक काशिद, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे, डॉ. बाळासाहेब सावंत, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे आदी तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यातील काहींनी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधत शेती विषयक माहिती विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निरसनही केले. यावेळी सहयोगी संशोधन संचालक डॉ. भरत वाघमोडे, श्रीधर गांगल, प्रतिभा अडूरकर, डॉ. विजय सागवेकर, डॉ. शशिकांत मेश्राम, डॉ. प्रवीण वणवे उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. भावे म्हणाले की, शेतीसारखा फायदेशीर व्यवसाय अन्य कोणताही नाही. कोरोनासारख्या कितीही महामार्या आल्या तरी शिक्षण आणि कृषी अव्याहतपणे सुरू राहील. दुसर्याच्या हाताखाली काम करण्याची मानसिकता सोडून विद्यार्थ्यांना कृषिक्षेत्रात आभाळभर संधी आहे. स्वतःचा व्यवसाय वा उद्योग उभारण्याची मनीषा ठेवून शिकलेल्या व्यक्तींना सोबत घेवून कृषिपूरक व्यवसाय, प्रक्रिया उद्योगाद्वारे रोजगार निर्माणकर्ते व्हायला हवे, असे त्यांनी सांगितले. महासंचालक भागडे यांनी राज्यातील कृषी पदवी व पदविकांसाठी असलेल्या विविध अभ्यासक्रमांची त्यातून निर्माण होणार्या रोजगाराच्या संधींची माहिती दिली. विनायक काशिद म्हणाले की, विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय ठेऊन ते पूर्ण करण्याचा ध्यास घेत स्वप्ने बघावी, तन्मयतेने अभ्यास करावा व कृषी क्षेत्रातील अमर्याद संधीचा लाभ घेत नावलौकिक वाढवावा. डॉ. शिनगारे यांनी शेतीविषयक माहिती देताना जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी दुर्दम्य इच्छाशक्ती आणि जिद्द बाळगावी, असा मार्मिक सल्ला त्यांनी स्वतःचे अनुभव व्यक्त करीत दिला.
यावेळी प्रतिभा अडूरकर आणि शिक्षक प्रतिनिधी रंगनाथ गोड यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. भरत वाघमोडे यांनी प्रास्ताविक आणि कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र मर्दाने यांनी केले. यावेळी सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.