| म्हसळा | प्रतिनिधी |
तालुक्यात बिबट्याच्या सतत होत असलेल्या दर्शनामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. म्हसळा तालुक्यातील पानवे येथे जिल्हापरिषद शाळेतील परिसरात बिबट्या दिसल्याचे शाळेतील विद्यार्थ्यांनी सांगितले. शाळेतील विद्यार्थ्यांना भर दिवसा बिबट्या दिसताच एकच खळबळ उडाली. काही वेळात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असून नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. शाळेत विद्यार्थ्यांना बिबट्या दिसल्याने विद्यार्थ्यांचा सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या परिसरात बिबट्याचे वारंवार पाळीव जनावरांवर हल्ले होत आहेत. बिबट्याच्या हालचाली लक्षात घेता तातडीने वन विभागाने घटनास्थळी पथक पाठवून पाहणी करावी व पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. मानवी वस्ती आणि वन्यप्राणी यांच्यातील वाढता संघर्ष या घटनेननंतर पुन्हा गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. नैसर्गिक अधिवासाचा ऱ्हास, जंगलतोड आणि मानवी अतिक्रमणामुळे वन्यप्राणी अन्न आणि पाण्याच्या शोधात शहरांजवळच्या किंवा थेट मानवी वस्त्यांमध्ये प्रवेश करत आहेत. बिबट्या, माकड, रानडुक्कर आणि अन्य वन्यजीवांचा वाढलेला वावर केवळ शेतीचे नुकसान करत नाही, तर मानवी जीवालाही धोका निर्माण करत आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी नैसर्गिक परिसंस्थेचे संरक्षण करणे आणि वन्यप्राण्यांसाठी सुरक्षित वाहतूक मार्ग उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे.







