नगराध्यक्षा आराधना दांडेकर यांचे आवाहन
| आगरदांडा | प्रतिनिधी |
राजमाता जिजाऊ यांचे आदर्श मातृत्व, दूरदृष्टी आणि छत्रपती शिवाजी महाराजांवर घडवलेले संस्कार त्यांच्या विचारांतून मिळणारी प्रेरणा आजच्या पिढीसाठी अत्यंत आवश्यक आहे. तरी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षणाबरोबर सामाजिक बांधिलकी जपत राष्ट्रनिर्मितीत योगदान द्यावे, असे आवाहन नगराध्यक्षा आराधना दांडेकर यांनी केले. त्या कोकण उन्नती मित्र मंडळाचे वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालयातील सभागृहात स्त्रीशक्तीचा सन्मान अभिवादन सोहळ्याप्रसंगी बोलत होत्या.
यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्षा आराधना दांडेकर, प्राचार्य डॉ. जनार्दन कांबळे, डॉ.श्रीशैल बहिरगुडे, डॉ. सुभाष म्हात्रे, माजी प्रभारी प्राचार्य डॉ. विश्वास चव्हाण, महाविद्यालय विकास समितीच्या सदस्या वासंती उमरोटकर, नगरसेविका प्रांजली मकू, प्रमिला माळी, देवयानी गुरव, प्रीता चौलकर, श्रद्धा अपराध, ॲड. मृणाल खोत, तरन्नूम फराश, डॉ. नारायण बागुल, प्रा. श्रीशेल भैरगुंडे, डॉ. सीमा नाहिद, प्रा. प्रवेश पाटील, प्रा. चिंतन पोतदार, प्रा. प्रणव बागवे, प्रा. सिद्धेश सतविडकर, प्रा. मुस्कान रज्जब, प्रा. रुफी हसवारे, वरिष्ठ लिपीक गणेश लाड, अतिश आगरावकर व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले व स्वामी विवेकानंद यांच्या यांच्या प्रतिमांचे पूजन करून वासंती उमरोटकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयाच्यावतीने वासंती उमरोटकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मानपत्र देऊन नगराध्यक्षा आराधना दांडेकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच नवनिर्वाचित नगरसेवकांचा ही यावेळी सत्कार करण्यात आला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जनार्दन कांबळे यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंदांच्या प्रेरणादायी विचारांचा अंगीकार करून शिक्षणासोबतच चारित्र्यनिर्मितीवर भर देण्याचे आवाहन केले. तसेच सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळेच आज शिक्षणाचा मार्ग सर्वांसाठीला झाला व राजमाता जिजाऊ कौटुंबिक, सामाजिक व राजकीय परिस्थितीवर मात करत कसे शिवबास घडविले व स्वराज निर्माण केले हे त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले.
महाविद्यालय विकास समितीच्या सदस्या वासंती उमरोटकर यांनी महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचे सहकार्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले तसेच राजमाता जिजाऊ यांच्या संस्कारातून छत्रपती शिवाजी महाराज घडले, याचा संदर्भ देत विद्यार्थ्यांनी इतिहासातून प्रेरणा घ्यावी, असे मत व्यक्त केले.







