| नेरळ | वार्ताहर |
युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशन इंडिया यांच्या वतीने एस. जे. टी. इंटरनॅशनल स्कूल, कळंबोली येथे जिल्हास्तरीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत नेरळ येथील नालंदा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत चषक, सन्मानचिन्ह, 2 सुवर्ण आणि 4 रौप्य पदकांची कमाई करत घवघवीत यश संपादन केले.
या उल्लेखनीय यशाबद्दल नेरळ परिसरासह संपूर्ण कर्जत तालुक्यात नालंदा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे व त्यांच्या प्रशिक्षकांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या स्पर्धेत नेरळ येथील फेलिसिया डिसूझा, अभय फडतरे, पार्थ मोरे, सोहम भोईर, एल्विस रॉड्रिक्स व शाफिया खान या विद्यार्थ्यांनी सहभाग घेत आपल्या कौशल्याने आणि धाडसी प्रदर्शनाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. प्रशिक्षक अविनाश जाधव आणि जीवन धाकवाल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, विद्यार्थ्यांनी दाखवलेली मेहनत, आत्मविश्वास व खेळाडूवृत्ती यामुळे नालंदा अकॅडमीचा नावलौकिक अधिक वाढला आहे. नेरळ पूर्व येथे अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या नालंदा अकॅडमीमध्ये कराटेसह डान्स, संगीत, स्विमिंग, योग क्लासेस घेतले जात असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला जात आहे.
शिक्षण तर सगळीकडे मिळू शकते, पण आम्ही विद्यार्थ्यांना सर्वप्रथम आत्मविश्वास, शिस्त आणि जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्याची ताकद शिकवतो. आज विद्यार्थ्यांनी मिळवलेले हे यश त्याच प्रयत्नांचे फलित आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांकडून अशीच उज्वल कामगिरी होणार यात शंका नाही.
– अविनाश एम. जाधव
प्रशिक्षक, नालंदा अकॅडमी, नेरळ







