| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
विज्ञान दिनाचे औचित्य साधून राजीप नेणवली शाळेमध्ये विज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या विज्ञान सप्ताहात विविध उपक्रम राबविण्यात आले. विविध प्रयोगांचे सादरीकरण देखील विद्यार्थ्यांनी केले. गटशिक्षणाधिकारी शिल्पा दास, केंद्र प्रमुख कल्पना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नेणवली शाळेमध्ये विज्ञान सप्ताहाचे आयोजन केले होते. या सप्ताहामध्ये इयत्ता पहिली ते पाचवी आणि इयत्ता सहावी ते सातवी या दोन गटांमध्ये विविध स्पर्धा आणि उपक्रमाचे घेण्यात आले. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी पोस्टर व चित्रकला स्पर्धा घेतल्या गेल्या. यामध्ये आपली पृथ्वी आणि माझ्या परिसरातील माझे दोस्त सोबती या विषयांचा समावेश होता. त्याचबरोबर इयत्ता सहावी व सातवी करता वैज्ञानिक रांगोळी व निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी स्वयंपाकघरातील विज्ञान, विज्ञानातील संकल्पना, माझी शाश्वत जीवनशैली हे विषय देण्यात आले होते. त्याच बरोबर डायट पनवेल यांच्यामार्फत आणि सुधागड तालुका गटशिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान प्रयोग दिग्दर्शन व्हिडिओ निर्मिती स्पर्धा इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांकरिता घेण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या विज्ञान पाठ्यपुस्तकातील परिसर पाठ्यपुस्तकातील छोटेछोटे प्रयोग दिग्दर्शन करून त्याचे व्हिडिओ अपलोड केले. विज्ञान दिनाच्या दिवशी विज्ञान प्रयोग व मॉडेल यांचे प्रत्यक्ष प्रदर्शन ठेवण्यात आले. यामध्ये इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी आपले छोटे प्रयोग, मॉडेल, त्याची वैज्ञानिक माहिती सादरीकरण करून विज्ञान सप्ताह यशस्वीरीत्या साजरा केला. विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन वृद्धिंगत व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून शासनाच्या वतीने या विज्ञान सप्ताहाचे आयोजन शाळा स्तरावर करण्यात आले होते. या संपूर्ण कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक संतोष हरपाल, उपशिक्षक राजेंद्र अंबिके व गणपत वरगडे नियोजन करून मेहनत घेतली.