जनजागृतीसाठी विद्यार्थी उतरले रस्त्यावर

। माणगाव । वार्ताहर ।
समाजातील वाढती व्यसनाधीनता आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम याकडे लक्ष केंद्रित करण्याकरिता लोणेरे येथील एस एस निकम हायस्कूलच्या इयत्ता आठवी आणि नववीच्या विद्यार्थ्यांनी नुक्कड नाटक सादर केले. हे नाटक बाजारपेठेत ठिकठिकाणी सादर होत असून त्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

समाजात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या व्यसनाधीनते मुळे सामाजिक तसेच कौटुंबिक स्वास्थ्य धोक्यात येत चालले आहे. वाढती गुन्हेगारी आणि कर्करोगामुळे होणारी जीवितहानी टाळायची असेल तर समाज व्यसनमुक्त होणे गरजेचे आहे हा संदेश देण्यासाठी विद्यार्थ्यांनी चक्क रस्त्यावर उतरत पथ नाट्य करून जनजागृतीकेली. गोरेगाव बस स्थानकात या विद्यार्थ्यांनी तंबाकू, गुटखा खाल्ल्याने दारू प्यायल्याने त्याचे कसे विपरीत परिणाम होतात त्यातून कसा अंत होऊन कुटुंबाची वाताहत होते याचे सादरीकरण केले.

यावेळी दर्शना चावरेकर, प्रियदर्शनी पाटील यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या या नुक्कड नाटकात मधुरा गडकरी, सर्वेश गोरेगावकर, वेद शिंदे, नेहा गोरेगावकर, गौरी मेटरकर, ईश्‍वरी घोसाळकर, वैभव मोहिते, अर्षदा मुरूडकर, कुशल पाटील, ओम गावनर या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. गोरेगाव पोलीस ठाण्याच्या कर्मचार्‍यांसह ग्रामस्थांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Exit mobile version