। म्हसळा । प्रतिनिधी ।
सर्वांचाच लाडका असलेल्या गणपती बाप्पांचे आगमन अगदी चार दिवसांवर आले आहे. या बाप्पांची मूर्ती कशी तयार होते, याची माहिती जाणून घेण्यासाठी म्हसळा शहरातील पीएमश्री जिल्हा परिषद शाळेतील तिसरी व चौथीच्या चिमुकल्यांनी कुंभारआळी येथील गणपती कारखान्यास भेट दिली आणि मूर्ती कलेचे धडे जाणून घेतले.
सध्या सर्वच कारखान्यात कारागिरांची गणेशमूर्तीवर शेवटचा हात फिरवण्याची लगबग सुरू आहे. शाळेतील विद्यार्थ्यांनी विद्याप्रवेश क्षेत्रभेट आणि कार्यानुभव विषयांतर्गत मातीच्या वस्तू बनवणे व उद्योगधंद्यांना भेट अंतर्गत पाभरेकर यांचा गणेशमूर्ती बनवण्याच्या कारखान्यास भेट दिली. यावेळी जितेंद्र पाभरेकर यांचाकडून विद्यार्थ्यांना गणेशमूर्ती तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, रंग, पेंट साहित्य, कलर मशीन, सजावट साहित्य, मूर्ती तयार होण्यासाठी लागणारा कालावधी,उपलब्ध बाजारपेठ व एक मूर्ती तयार करण्याची प्रात्यक्षिक व तिचे रंगकाम करून दाखवत माहिती देण्यात आली. यावेळी संजय कर्णिक, शशिकांत शिर्के, दीपक मुंडे, इंदिरा चौधरी, साक्षी जंगम उपस्थित होते.







