पनवेल बाजारपेठेत हटके राख्यांची रेलचेल
| पनवेल | राजेश डांगळे |
रक्षाबंधन काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे पनवेल शहरात सणाचे वारे जोरात वाहू लागले असून, प्रत्येक दुकानामध्ये राखी खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. 25 रुपयांच्या साध्या राखीपासून ते दोन हजार रुपयांपर्यंतचे पर्याय उपलब्ध आहेत. ऑनलाइन खरेदीचा पर्यायही खुला असून, राखीसोबत मिठाई व इतर भेटवस्तूचे पाकीट खरेदीसही पसंती दिली जात आहे. मात्र, यंदाच्या राखी विक्रीत एक खास गोष्ट लक्षवेधी ठरतेय परंपरेला स्पर्श करत, आधुनिकता झळकावणाऱ्या ‘ट्रेंडी राख्या’ ग्राहकांच्या पसंतीस उतरल्या आहेत.
गेल्या काही वर्षांपासून राखीच्या स्वरूपात मोठे बदल पाहायला मिळाले असून, यंदा बाजारात खास करुन फॅशन राखी, ज्वेलरी टच राखी आणि थीम बेस्ड राख्यांनी धुमाकूळ घातला आहे. कार्टून, सुपरहिरो, मेटॅलिक लूक, पर्ल आणि रुद्राक्ष अशा स्टाइलिश राख्यांचे खास आकर्षण आहे. पनवेल परिसरातील बाजारपेठेमधील दुकाने राख्यांनी सजली आहेत. याशिवाय प्रत्येक विभागातील किराणा दुकानापासून ते विविध ठिकाणी राखी विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत. रक्षाबंधनासाठीची मागणी लक्षात घेऊन विविध प्रकारच्या राख्या बाजारात उपलब्ध आहेत. लहान मुलांना कार्टूनचे चित्र असलेल्या राख्यांसह ब्रेसलेट, पर्ल, चंदन, डिझायनर, जरदोसी, सीड्रोड, डायमंड, खुभराखी, रुद्राक्ष, चंदन व मौल्यवान खडे असलेल्या राख्यांचीही विक्री केली जात आहे. पूर्वी आकाराने मोठ्या राख्यांना ग्राहकांची पसंती मिळत होती. परंतु, आता आकाराने लहान व स्टायलिश राख्यांना पसंती मिळत आहे. सध्या राख्यांचा सरासरी भाव साधी राखी 25 ते 100, कुंदन वर्क 30 ते 160, भोती राख्या 20 ते 80, कपल राखी 30 ते 120, सोने-चांदी राखी 500 ते 2 हजार, लुबा राशी 500 ते 2000 असे असून, ऑनलाईन खरेदीमध्ये 25 रुपयांपासून ते 100 रुपयांपासून दोन हजार व त्याहीपेक्षा जास्त किमतीच्या राख्या उपलब्ध होत आहेत. तसेच दूरच्या शहरात राहणाऱ्या भावासाठी कुरिअरने राखी पाठविणेही शक्य होत असून, बजेटप्रमाणे पर्याय उपलब्ध आहेत. सध्या राख्या विक्रीच्या व्यवसायाने कोट्यवधीं रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नवीन काय?
पारंपरिक राख्यांपेक्षा हलक्या व आकर्षक ब्रेसलेट राख्यांना मागणी आहे. जोडप्यांसाठी ‘कपल राखी', पर्यावरणपूरक कापडी राख्यांना पसंती असून, गिफ्ट बॉक्समध्ये मिठाई, छोटं ग्रीटिंग आणि राखीचा संगम पाहावयास मिळत आहे. पूर्वी राखी फक्त भाऊ-बहिणीचा सण मानला जायचा. आता ती एक फॅशनेबल गिफ्ट होऊ लागली आहे, असं एका कॉलेज तरुणीचं मत आहे.
बाजारातील किमती
ब्रेसलेट/फॅशन राख्या: 50 ते 150
चंदन/रुद्राक्ष: 70 ते 250
कपल राखी सेट : 100 ते 300
सोन्याची झाक असलेली राखी : 500 ते 2000
ऑनलाइन खास पॅकिंगसह राखी गिफ्ट बॉक्स : 150 रुपयांपासून पुढे







