लग्नाच्या बेडीत अडका, पण गुन्हेगाराच्या हातकडीत नको!

सहा. पोलिस उपनिरिक्षक आर.व्ही. घरत यांचे आवाहन
| कोर्लई | वार्ताहर |
आजच्या गुन्हेगारीजगतापासून दूर राहताना लग्नाच्या बेडीत अडका, पण गुन्हेगाराच्या हातकडीत मात्र अडकू नका, असा मोलाचा सल्ला मुरुड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक आर.व्ही. घरत यांनी दिला. मजगाव येथील नज इंग्रजी माध्यमाच्या शाळेत ‘रेझिंग डे’निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना पोलिसांच्या विविध हत्यारांची माहिती देताना ते बोलत होते.

प्रेमात पडल्यावर श्रध्दा वालकरसारखे समाजात गुन्हे घडतात. महिलांवर होणारे अत्याचार कसे थांबवता येतील त्यासाठी काय करावे लागेल, याबाबत मार्गदर्शन करताना महिलांनीही त्यांच्यावर अत्याचार होत असताना तसेच इतरांनीही अशावेळी गप्प न बसता ते पोलिसांच्या निदर्शनास आणून द्यावेत. त्यासाठी 100 अथवा 112 क्रमांकावर कॉल करुन माहिती द्यावी. तरुणींना एखादा इसम कोणत्याही प्रकारचा त्रास देत असेल तर पोलीस ठाण्यात पत्र पाठवूनही कळविता येते व त्याची दखल निश्‍चितच घेतली जाते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. 26/11 सारखे मुंबईवरील दहशतवादी हल्ले टाळण्यासाठी अशा हालचाली निदर्शनास येताच पोलिसांना त्याची त्वरित माहिती द्यावी, असेही ते पुढे म्हणाले.

याप्रसंगी त्यांचे सहकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल वाय.टी. निकाळे, पोलिस कॉन्स्टेबल डी.डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना आर.डी.255 रायफल, बंदुक, बुलेट आदी शस्त्रांची रचना व कार्य यांची सखोल माहिती दिली. विद्यालयाचे शिक्षक आशिष अशोक बुल्लु यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर मतिन हमदुले यांनी आभार मानले.

Exit mobile version