सुभाष हातोळे यांची शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती

| नेरळ | प्रतिनिधी |

शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते सुभाष हातोळे यांची पक्षाचे माथेरान शहर उपाध्यक्ष पदावर नियुक्ती झाली आहे. शहर अध्यक्ष उमेश कदम यांनी ही नियुक्ती केली असून, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश खैरे यांच्या आदेशाने ही नियुक्ती झाली आहे.

कर्जत-खालापूर तालुक्याचे माजी आमदार सुमंतराव राऊत यांचे माथेरान हे तालुक्यातील निवासस्थान होते. त्यामुळे माथेरानमध्ये शेतकरी कामगार पक्षाची चांगली नाळ जुळली होती आणि माथेरानमध्ये असंख्य कार्यकर्ते पक्षाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होते. माथेरान नगरपरिषदेमध्ये अनेक पदांवर शेकापचे नगरसेवक विराजमान झाले आहेत. मात्र, काळाच्या ओघात माथेरानमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते कमी झाल्याने पक्ष आपले अस्तित्व राखू शकला नाही. मात्र, पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पक्षाची कमान कायम ठेवत पक्षाचे ध्येयधोरणे जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. शेकापची ध्येयधोरणे राबविणारे कार्यकर्ते माथेरान शहरात असून, शहर चिटणीस उमेश कदम यांनी नवीन फळी निर्माण करण्यास घेतली आहे. पक्षाच्या बांधणीत आपल्या जुन्या कार्यकर्त्यांना संधी देण्याचा निर्णय पक्ष नेतृत्वाने घेतला आहे. त्यामुळे जिल्हाध्यक्ष सुरेश खैरे यांच्या आदेशाने जूने कार्यकर्ते सुभाष हातोळे यांच्यावर पक्षाने शहर उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे. सुभाष हातोळे यांच्या निवडीने जुने कार्यकर्ते समाधानी झाले असून, पक्षाला उभारी देण्यासाठी पक्षाचा प्रयत्न असल्याचे शहर चिटणीस उमेश कदम यांनी स्पष्ट केले आहे.

Exit mobile version