जिल्हा उपनिबंधक जगताप यांचे आवाहन
| अलिबाग | वार्ताहर |
राज्याच्या सहकार चळवळीमध्ये उत्कृष्ट योगदान दिलेल्या राज्यातील सहकारी संस्थांना शासनामार्फत सहकार पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. यास्तव रायगड जिल्ह्यातील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत नोंदणी झालेल्या इच्छुक सहकारी संस्थांनी आपले विहित नमुन्यांतील प्रस्ताव कालबद्ध कार्यक्रमानुसार दि. 2 ते 31 जुलै या मुदतीत संबंधित सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्या कार्यालयाकडे आवश्यक कागदपत्रांसह दाखल करावेत, असे आवाहन रायगड जिल्हा सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक प्र.का. जगताप यांनी केले आहे.
सन 2023-24 या आर्थिक वर्षातील कामगिरीच्या आधारावर ‘सहकारमहर्षी’ पुरस्कार 1, ‘सहकारभूषण’ पुरस्कार 21 व ‘सहकारनिष्ठ’ पुरस्कार 23, याप्रमाणे सहकार पुरस्कारासाठी संस्थांची निवड करण्यात येणार आहे, अशी माहिती जगताप यांनी दिली.
सर्व सहकारी संस्थांच्या पुरस्कारासाठीचे निकष व गुणांचा तपशिल याची सविस्तर माहिती मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालयाच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर तसेच या कार्यालयात उपलब्ध आहेत. तरी, सहकार पुरस्कारासाठी रायगड जिल्ह्यातील इच्छुक संस्थांनी आपले प्रस्ताव उपरोक्त मुदतीत संबंधित सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, यांच्या कार्यालयाकडे आवश्यक कागदपत्रांसह दाखल करावेत, असे आवाहन जगताप यांनी केले आहे.







