जीवनात यशप्राप्तीसाठी प्रयत्नात सातत्य हवे

| म्हसळा | वार्ताहर |

जीवनात यश प्राप्त करायचे असेल तर प्रयत्नात सातत्य राखणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन समाज कल्याण कोकण विभागाचे उपायुक्त प्रमोद जाधव यांनी केले. म्हसळा तालुक्यात रवीप्रभा मित्र मंडळ संस्था रायगड यांच्या विद्यमाने दहावी ते पदवीधर विद्यार्थ्यांकरिता एमपीएससी, यूपीएससी मार्गदर्शन शिबीर न्यू इंग्लिश स्कूल म्हसळा येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी श्री. जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

जाधव पुढे म्हणाले की, विशेष मुलाखतीत कसे सामोरे जावे, स्पर्धा परीक्षा देत असताना अभ्यासाची रूपरेषा कशी असावी, मोजका अभ्यास कसा करावा, मुलाखती घेणार्‍या अधिकार्‍यांसमोर आपली शिस्तप्रियता कशी असावी, वृत्तपत्राचे वाचन करताना कसे वाचन करावे याबाबत महत्वाचे असणार्‍या बाबी बाजूला काढून संग्रह करावा अशा अनेक प्रकारच्या मार्गदर्शक सूचना व आपल्या आयुष्यात आलेल्या मुलाखतीचा आढावा अचूक शब्दांत सांगितला.

कार्यक्रमासाठी उपायुक्त समाज कल्याण विभाग प्रमोद जाधव, म्हसळा तहसीलदार समीर घारे, गटविकास अधिकारी भाऊसाहेब पोळ, म्हसळा पोलीस निरीक्षक संदीपान सोनावणे, म्हसळा नगर पंचायत मुख्याधिकारी मनोज उकिर्डे, गटशिक्षणाधिकारी संतोष दौंड, न्यू इंग्लिश स्कूल चेरअमन समीर बनकर, मुख्याध्यापक प्रकाश हाके, उद्योगपती नंदकुमार सावंत, गौरव पोतदार, आशिष शिंदे, प्रदीप कदम, स्वप्नील लाड, सुशांत लाड, संतोष सुर्वे, संतोष उद्धरकर, महिला दक्षता अध्यक्षा रेखा धारिया, कुमारी अडागळे, दिलीप कांबळे, विद्यार्थी, शिक्षक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version