मच्छीमारांच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी
| अलिबाग | शहर प्रतिनिधी |
आक्षी-रायवाडी खाडीतील जीर्ण झालेल्या विजेच्या खांबामुळे मच्छिमारांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. ‘कृषीवल’च्या दणक्याने हे काम युध्द पातळीवर करण्यात आले. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागल्याने अनेकांनी आभार व्यक्त केले आहेत.
दहा महिन्यांपुर्वी खाडीमधील विद्युत पोल जीर्ण झाले होते. खांबावरील तारा खाडीतील पाण्यामध्ये लोंबकळत होत्या. भरतीच्यावेळी पूर्णपणे पाण्यात बुडल्या जात. रायवाडी येथील कोळी बांधव प्रामुख्याने भरतीच्यावेळी आपल्या होड्या घेऊन मासेमारीस जात असतात. दरम्यान, पाण्यात बुडालेल्या विजेच्या तारांना धक्का लागल्यास जीवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे कोळी बांधवांना जीव मूठीत घेऊन मासेमारी करावी लागत होती. अखेर आक्षीमधील शेकाप नेत्यांच्या मदतीने हा प्रश्न सोडविण्यात आला. आक्षीतील शेकाप कार्यकर्त्यांच्या पाठपुराव्याबरोबरच ‘कृषीवल’च्या दणक्याने प्रशासन खडबडून जागे झाले. त्यांनी तात्काळ विजेचा खांब बदलून नवीन खांब बसविले.
10 मे, 2023 रोजी आक्षी गावचे शेकाप नेते अभिजित वाळंज, रश्मी वाळंज, संतोष राऊळ, मंगेश बानकर यांच्यासह कोळी बांधवांनी अलिबाग येथील महावितरण कार्यालयात जाऊन तत्कालीन महावितरणचे अधिकारी इनामदार यांना याबाबत निवेदन दिले होते. याबाबत कृषीवलनेदेखील आवाज उठवला होता. त्यानंतर त्याची कार्यवाहीदेखील सुरु झाली होती.
भरतीच्या वेळी विद्युत खांब स्थानीक मच्छिमारांच्या मदतीने होडीला बांधून तरंगवत पलिकडे नेण्यात आले. आहोटीच्या वेळी त्या ठिकाणी खड्डे खणून विजेचे खांब लावण्यात आले. वाहत्या पाण्यात अशाप्रकारे विजेचे खांब बसवणे खुप कठिण व धोक्याचे होते. स्थानिक तसेच शेकाप नेते अभिजीत वाळंज, विनायक पाटील, संतोष राऊळ, शक्ती बानकर, मंगेश बानकर यांच्या सहकार्यामुळे हे कठीण काम सोयीचे झाल्याचे सांगण्यात आले आहे. अखेर दहा महिन्यांनी सोमवार दि.18 मार्च रोजी काम पुर्णत्वास गेले. यासाठी महावितरणचे कनिष्ठ अभियंता प्रदिप वाघमारे, कर्मचारी अमोल लांगी, अनंत मुंडे, कुमारदीप गायकवाड, देवदत्त मुंढे, अंकुश पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.
तांत्रीक कारणांमुळे कामात दिरंगाई होत होती. नागाव येथे रूजू झाल्यापासून लवकरात लवकर काम पुर्णत्वास नेण्याचा प्रयत्न केला. सुरूवातीला कंत्राटदारांनी संबंधीत जीर्ण खांब काढून नवीन खांब पुरले ते उंचीला कमी व निकृष्ठ दर्जाचे होते. या खांबाच्या चारही बाजूला खाडीचे पाणी असल्याकारणाने ते खराब झाल्याने वारंवार बदलणे शक्य नव्हते. त्यामुळे मी स्वतः यात लक्ष घालून नव्याने पुरलेले खांब काढून चांगल्या प्रतिचे व दुप्पट उंचीचे लोखंडी खांब पुरण्यात आले.
प्रदिप वाघमारे, कनिष्ठ अभियंता,
महावितरण कंपनी
येथील मच्छिमार माझ्याकडे आले आणि आम्ही 10 मे 2023 रोजी अलिबाग महावितरण कार्यालयात याबाबत लेखी निवेदन दिले. तत्काळ कामास सुरवात झाली होती. परंतु, महावितरणकडून दिरंगाई होत होती. याबाबत वेळोवेळी आम्ही पाठपुरावा करत होतो. स्थानिक तसेच युवा कार्यकर्ते, महावितरणचे अधिकारी, अभियंता व कर्मचारी यांच्या सहकार्यामुळे आज कोळी बांधवांची जीव मुठीत घेऊन मासेमारी करण्याची समस्या थांबली आहे.
अभिजीत वाळंज, शेकाप युवा नेते
गेली वर्षभर खाडीतील विजेचा खांब वाकून त्यावरील विजेच्या तारा खाडीच्या पाण्यावर तरंगत होत्या. 50 ते 60 कोळी बांधव आपला जीव मुठीत घेउन मासेमारी करत होते. याबाबत युवा नेते अभिजीत वाळंज यांना सांगीतले असता त्यांनी तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांकडे याचा पाठपुरावा केला. अखेर शेकाप, कृषीवल व महावितरण यांच्या सहकार्याने जीव धोक्यात टाकून करण्यात येणारी मासेमारी थांबली.
मंगेश बानकर, स्थानिक मच्छिमार