बंद असलेली कंपनी सुरु करण्यात यश!

| उरण | वार्ताहर |

इसांबे ता. खालापूर येथील मे. डीएसव्ही केमिकल्स कंपनी मागील नऊ महिन्यांपासून बंद होती. मात्र कामगार नेते महेंद्र घरत यांच्या मध्यस्थीने ही कंपनी पुन्हा सुरु करण्यात यश आले आहे. कंपनीमध्ये बळवंतराव पवार यांची कामगार संघटना व व्यवस्थापन यांच्यात पगारवाढीची चर्चा असफल झाल्यामुळे कामगारांनी कामबंद केले होते. नऊ महिने कंपनी बंद असल्यामुळे पगार नाही, कामगारांना उत्पन्न नाही त्यामुळे कामगार अस्वस्थ झाले व कामगारांनी कामगार नेते महेंद्र घरत यांची भेट घेऊन कंपनी सुरु करण्यासाठी आम्हांस सहकार्य करावे अशी विनंती केली.

घरत यांनी कंपनी व्यवस्थापनाबरोबर वाटाघाटी करून बंद कंपनीतील कामगारांना 7000 रुपये पगारवाढ करण्याचा करार केला व 12 जुलै पासून कंपनी पूर्ववत सुरु होत आहे. कामगार नेते महेंद्र घरत यांच्या मध्यस्थीने 52 कामगारांचा रोजीरोटीचा प्रश्‍न मार्गी लागला. कामगारांना 7000 रुपये पगारवाढ, 16800 रुपये बोनस, परीवारासाठी मेडिक्लेम सुविधा देण्याचा करार दि. 10 जुलै 2023 रोजी करण्यात आला. यावेळी महेंद्र घरत, सरचिटणीस वैभव पाटील, व्यवस्थापनातर्फे डायरेक्टर धनंजय साठे, गौरव साठे, फॅक्ट्री मॅनेजर प्रशांत मानकामे, कायदेशीर सल्लागार सईद मुल्ला, असीफ मुल्ला, मनीष धुतीया तर कामगार प्रतिनिधी राकेश पाटील, दीपक देवघरे, संजय देवघरे, ज्ञानेश्‍वर तेलंगे, मधुकर शिंदे, मनोहर देवघरे उपस्थित होते.

Exit mobile version