चिपळूण बचाव समितीच्या लढ्याला यश

वाशिष्ठीतील गाळ काढण्यास मंजुरी
। चिपळूण । वार्ताहर ।
चिपळूणला पूूरमुक्त करण्यासाठी बचाव समितीच्यावतीने गेले चार दिवस साखळी उपोषण करण्यात येत आहे. या लढ्याला यश आले आहे. आमदार शेखर निकम यांनी पहिल्या दिवशी या उपोषणस्थळी भेट दिली व जाहीर पाठिंबा दिला तर दुसर्‍याच दिवशी ते मुंबईत पोहोचले व जलसंपदामंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांनी भेट घेतली. आमदार शेखर निकम यांच्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे.
उपमुख्यमंत्री यांनी आज गुरुवारी सकाळी शेखर निकम यांना बोलावून घेतले आणि येत्या हिवाळी अधिवेशनात गाळ काढण्यासाठी साडेसात कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देत असल्याचे जाहीर केले. तसेच तातडीने गाळ काढण्यास सुरूवात करा अशी सूचना केली. या वेळी जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता तथा सहसचिव अतुल कपोले व अन्य अधिकारी उपस्थित होते. आमदार राजीनामा द्यायला निघालेत, लोकं उपोषणाला बसलेत, तुम्ही करताय काय, असे सांगत तातडीने चिपळूणमधील नद्यांमधील गाळ काढण्यासाठी यांत्रिकी विभागाला साडेसात कोटी रुपये द्या, असा आदेश उपमुख्यमंत्री यांनी श्री. कपोले यांना दिला आहे. पुरवणी यादीमध्ये यांत्रिकी विभागासाठी साडे सात कोटीची डीझेलसाठी तरतूद करतो, तुम्ही काम चालू करा, असे पवार म्हणाले.

Exit mobile version