मागण्या मान्य झाल्याने जेएनपीटी चॅनेल बंद आंदोलन स्थगित
| उरण | वार्ताहर |
गेली 38 वर्षांहून जास्त काळ लोटला तरी उरण तालुक्यातील जेएनपीटी विस्थापित शेवा कोळीवाडा गावाचे शासनाचे मापदंडाने पुनर्वसन न झाल्याने व शासन जाणूनबुजून जेएनपीटी विस्थापित शेवा कोळीवाडा यांच्या मागणीकडे नेहमी दुर्लक्ष करीत असल्याने शासनाच्या वेळकाढूपणाच्या धोरणाचा निषेध करण्यासाठी दि. 15 ऑगस्ट रोजी शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेतर्फे तसेच शेवा कोळीवाडा ग्रामस्थांतर्फे मोरा ते घारापुरी या भागात मासेमारी जमिनीत बेमुदत मासेमारी करण्याचा निर्धार करत जेएनपीटी (जेएनपीए)चे चॅनेल बंद आंदोलन करण्याचा संकल्प केला होता. तसा इशाराही प्रशासनाला देण्यात आला होता. शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटना व शेवा कोळीवाडा विस्थापित ग्रामस्थ यांच्या मागणीचा तातडीने विचार करून प्रशासनाने त्यांची बैठक बोलावली. बैठकीत 13 मागण्या मान्य केल्याने 15 ऑगस्ट रोजी होणारे जेएनपीटी (जेएनपीए ) चे चॅनेल बंद आंदोलन पुढे ढकलण्यात आले आहे.
उरण तालुक्यातील जेएनपीटी विस्थापित शेवा कोळीवाडा पुनर्वसन संदर्भात शासनाचे सबंधित विभागाचे अधिकारी, जेएनपीटीचे अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी, शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटना आणि विस्थापित यांची दि.13 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता जेएनपीटी (जेएनपीए) कॉन्फरन्स हॉल तळ मजला प्रशासन भवन, शेवा, नवी मुंबई येथे बैठक झाली. त्या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी शेवा कोळीवाडा विस्थापितांवर केलेले गुन्हे मागे घेणे व हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायत विसर्जन करणे, हनुमान कोळीवाडा महसुली गाव अधिसूचना रद्द करणे व जेएनपीटी विस्थापित शेवा कोळीवाडा संक्रमण शिबिराचा सांभाळ जेएनपीए प्रशासन करणार, संक्रमण शिबिरातील सर्व घरे, जोती, मंदिरे वगैरेचे मूल्यांकन करून चालू बाजार भावानुसार रक्कम देणार आणि 256 भूखंड व नागरी सुविधेचे भूखंड यांना शेवा सर्व्हे नंबर देण्याचे आणि पुनर्वसनाची कामे चालू करण्याबाबतची कामे 1 ते 13 मुद्द्यात अधिकार्यांना विभागून दिलेली आहेत. ते 13 मुद्दे भारत वाघमारे उपजिल्हाधिकारी पुनर्वसन अलिबाग व उन्मेष वाघ अध्यक्ष जेएनपीटी आणि मनीषा जाधव जेएनपीएच्या मुख्य प्रबंधक व सचिव, राहुल मुंडके प्रांतधिकारी (उपविभागीय अधिकारी पनवेल), उद्धव कदम तहसीलदार उरण, समीर वठारकर गटविकास अधिकारी पंचायत समिती उरण, अश्विनी जाधव प्रशासकीय अधिकारी हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायत, ग्रामसेवक हनुमान कोळीवाडा ग्रामपंचायत तसेच एमआयडीसी, भूमी अभिलेख, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी श्री. राजपूत – सहाय्यक पोलीस आयुक्त, अंजुमन बागवान वरिष्ठ पोलीस निरीक्षक न्हावा शेवा बंदर विभाग या पोलीस अधिकार्यांसमोर मान्य केल्याने पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन, जेएनपीटी प्रशासन यांच्या विनंतीस मान देऊन दि.15 ऑगस्ट रोजीचे जेएनपीटी चॅनेल बंद आंदोलन शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटना आणि विस्थापित यांनी पुढे ढकलले आहे. मात्र, मान्य केलेल्या मागण्यांची योग्य अंमलबजावणी न झाल्यास जेएनपीटीचे समुद्रातील चॅनेल बंद करण्याचा इशारा शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेने व शेवा कोळीवाडा विस्थापितानी प्रशासनाला दिला आहे.
या बैठकीस शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेतर्फे व ग्रामस्थांतर्फे हनुमान कोळीवाडा ग्रामसुधारणा मंडळाचे अध्यक्ष सुरेश कोळी, उपाध्यक्ष मंगेश कोळी, माजी सरपंच परमानंद कोळी, ग्रामस्थ रमेश कोळी, नितीन कोळी, हरेश कोळी, दीप्ती कोळी, ज्योती शेवेकर, उज्वला कोळी, सविता कोळी, प्रणाली कोळी व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.