माथेरान व्हॅली स्कूलचे उत्तुंग यश

। नेरळ । प्रतिनिधी ।

शिर्डी येथे राष्ट्रीय कुम बोकातोर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय स्तरावरील पहिल्या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील वंजार पाडा येथील माथेरान व्हॅली इंग्लिश मिडीयम स्कूलने उत्तुंग यश मिळविले आहे.

महाराष्ट्र राज्यातील शिर्डी येथे झालेल्या पहिल्या राष्ट्रीय कुम बोकातोर स्पर्धेत माथेरान व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूलच्या पाच खेळाडूंनी यशस्वी कामगिरी केली आहे. या पहिल्या वहिल्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र संघाला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. त्यात माथेरान व्हॅली शाळेच्या विद्यार्थ्यांचे मोठे योगदान राहिले आहे. माथेरान व्हॅली इंग्लिश मीडियम स्कूलचे पाच सुवर्ण पदक आणि तीन रौप्य पदके मिळवून उतूंग यश संपादन केले. या शाळेच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करताना राज्यस्तरीय वरिष्ठ खेळाडूंकडून पाठीवर थाप मिळविली. या राष्ट्रीय स्पर्धेत माथेरान व्हॅली इंग्लिश मिडीयम स्कूलचे मोक्सीत दाबेकर, यश इंदलकर, दिशांत भोईर, निसर्गा गवळी, दिशा शेळके यांनी सुवर्ण पदकाला गवसणी घातली. तसेच, आदित्य आचार्य, प्रतिक खोकले, वेदिका पेरणे यांनी रौप्य पदक मिळवीत यश संपादन केले.

आपल्या शाळेच्या यशाबद्दल माथेरान व्हॅली इंग्लिश मिडीयम स्कूलचे भारत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गोपा कुमार नाय्यर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका मृदुला पटेल यांनी अभिनंदन केले आहे. कोम बोकातोर स्पर्धेतील यशामध्ये शाळेचे प्रशिक्षक स्वप्निल अडूरकर यांचे मोठे योगदान राहिले आहे.

Exit mobile version