| पेझारी | वार्ताहर |
अंधश्रद्धा निर्मूलन समिती ता. अलिबाग तर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून अलिबाग तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी गटवार चित्रकला, निबंध, गीत-गायन, भित्तीपत्रक तयार करणे इत्यादी स्पर्धा राबविण्यात आल्या. यामध्ये को.ए.सो. ना.ना.पाटील हायस्कूल पोयनाडमधील विद्यार्थ्यांनी भरघोस यश संपादन केले.
या स्पर्धांचा पारितोषिक वितरण समारंभ को.ए.सो. ना.ना.पाटील पोयनाड संकुलातील सुलभाकाकू सभागृहामध्ये संपन्न झाला. यावेळी मुख्याध्यापक कमलाकर फडतरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या समारंभप्रसंगी अंनिसचे निर्मला फुलगावकर, नितीन राऊत, पानस्कर सर, सुरेखा पाटील, ज्योती पाटील, पानसकर तसेच सत्रप्रमुख उदय पाटील, शिक्षिका आरती गिरकर, मनस्वीनी पाटील आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात संगीत शिक्षक राजेंद्र म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कलापथकाने सादर केलेल्या अंधश्रद्धा निर्मूलनविषयावर आधारित गीतगायनाने झाली. प्रास्ताविक निर्मला फुलगावकर यांनी केले. कार्यक्रमप्रसंगी अंनिसचे नितीन राऊत यांनी अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित प्रयोग करून दाखविले. पानसकर सर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली पाटील यांनी केले. यानंतर पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार आकर्षक प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी पटकाविलेली पारितोषिके: समूहगीत- प्रथम क्रमांक, चित्रकला स्पर्धा (पाचवी ते आठवी गट)- प्रथम क्रमांक- जागृती पाटील, तृतीय क्रमांक – प्रिया ठाकरे. (नववी/दहावी गट)- प्रथम क्रमांक- सई पाटील, तृतीय क्रमांक- आस्था पाटील, भित्तीपत्रक स्पर्धा- प्रथम क्रमांक- सई पाटील, आयुष पाटील, हर्ष फुटक, निबंध स्पर्धा- द्वितीय क्रमांक- सई गोंधळी, उत्तेजनार्थ-हर्षली पाटील तसेच चित्रकला शिक्षक देवेंद्र पाटील आणि मुख्याध्यापक यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शेवटी सायली पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि अंधश्रद्धा निर्मूलन पंचमहासूत्रे सांगून त्यांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.