शिवकर ग्रामस्थांच्या उपोषणाला यश

जिल्हा प्रशासनाकडून मागण्या मान्य, नागरीकांचा जल्लोष
। पनवेल । प्रतिनिधी ।
शिवकर गावात गावठाण विस्तार योजना राबविण्यात यावी, गुरचरण, वनखात्यात बांधलेली शेतघरे नियमित करा, या मागण्यांसाठी शिवकर ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच अनिल ढवळे व त्यांच्या सहकार्‍यांनी आमरण उपोषण करून केलेल्या मागण्या रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी तात्काळ मान्य केल्यामुळे उपोषणकर्त्यांचे समाधान झाले. गावठाण विस्तारयोजना 15 डिसेंबरपासुन महसुल खात्याचे व वनखात्याचे अधिकारी स्थळपाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल तयार करतील आणि तहसिलदार कार्यालयाच्या मार्फत उपजिल्हाधिकारी, उपविभागीय वन अधिकारी हे जिल्हाधिकार्‍यांना आठ दिवसांत अहवाल सादर करतील असे स्पष्ट आश्‍वासन जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी उपोषणकर्त्यांना दिले. त्याचबरोबर शिवकरमधील सर्व्हे नं. 129 व सर्व्हे नं. 59 मध्ये वनखत्याच्या व इतर सर्व्हे नंबरमध्ये बांधलेली घरे ही नियमित करण्याच्या दृष्टीकोनांतून येत्या आठ दिवसांत अहवाल सादर करण्याची सुचना जिल्हाधिकारी यांनी उपविभागीय वनाधिकारी, प्रशासकिय अधिकारी तसेच पनवेलचे तहसिलदार विजय तळेकर यांना तात्काळ दिल्याने उपोषणकर्त्यांनी केलेले आमरण उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.


जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयांत झालेल्या या बैठकीस उपोषणकर्ते शिवकरचे सरपंच अनिल ढवळे, नैना प्रकल्प अधिकारी जाधव, रायगड जिल्हावनाधिकारी आशिष ठाकरे, पनवेलच्या गटविकास अधिकारी लता मोहिते, विस्तार अधिकारी अविनाश घरत, जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल तहसिलदार विशाल दौंडकर, नवी मुंबई पंच्याण्णव गांव प्रकल्पग्रस्त शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश ठाकूर, जिप सदस्य शेखर शेळके, शिवकर ग्रामस्थ अरूण कांबळे, प्रविण कांबळे, ज्येष्ठ पत्रकार सुधाकर लाड, शिवकर ग्रामपंचायत सदस्य सुरज भगत, विष्णू पाटील, लक्ष्मण तुपे, ज्योति पाटील, नारायण तुपे,निलेश तुपे, अ‍ॅड. शशिकांत ढवळे उपस्थित होते. रात्री आठ वाजतां शिवकरमध्ये आठ दिवस सुरू असलेल्या या उपोषणाची सांगता करण्यात आली. पनवेलचे तहसिलदार विजय तळेकर यांच्या हस्ते उपोषणकर्ते सरपंच अनिल ढवळे, सखाराम पाटील, नरेश भगत, निकिता पाटील, शंकर तुपे यांनी लिंबू पाणी पिऊन उपोषण सोडले.या प्रसंगी शिवकरमधील ग्रामस्थांनी, तरूणांनी, असंख्य महिलांनी, ज्येष्ठ नागरीकांनी एकच जल्लोश केला. शिवकर मधील ग्रामस्थांच्या मागण्या मान्य झाल्याने प्रत्येक ग्रामस्थ समाधान व आनंद व्यक्त करीत होता.

Exit mobile version