एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली
| मुंबई | प्रतिनिधी |
महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीतर्फे 25 ऑगस्ट रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेची तारीख नंतर जाहीर केली जाईल, असे एमपीएससीने म्हटले आहे. गुरुवारी आयोगाच्या बैठकीमध्ये रविवार, दि. 25 ऑगस्ट रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला.
आबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीची राज्य सेवा संयुक्त पूर्व परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याने झालेल्या कोंडीमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विद्यार्थ्यांनी मागील दोन दिवसांपासून आंदोलनाचे हत्यार उपसले होते. या आंदोलनाला यश मिळालं असून, गुरुवारी (दि. 22) झालेल्या बैठकीत परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आला. परीक्षेची नवी तारखी लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. आयबीपीएस परीक्षा आणि एमपीएससीकडून दोन परीक्षा एकाच दिवशी ठेवण्यात आल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी मंगळवारी रात्रीपासून पुणे शहरात आंदोलन करण्यास सुरुवात केली होती. या आंदोलनाची दखल विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडूनही घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांकडून दबाव वाढत असल्याने या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता होती. त्याप्रमाणे आयोगाने निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आंदोलक विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.