‘मॅकविला द जंगल यार्ड’च्या प्रस्तरारोहकांकडून मोहीम फत्ते
| पाली/गोमाशी | वार्ताहर |
प्रसिद्ध प्रस्तरारोहक व सुधागड तालुक्यातील रहिवासी मॅकमोहन हुले व ‘मॅकविला द जंगल यार्ड’च्या सदस्यांनी अवगड असा ‘मच्छिंद्रगड-सुळका’ नुकताच यशस्वीपणे सर केला आहे. प्रस्तर मार्ग उंची 200 फूट, तर संपूर्ण प्रस्तरारोहण चढाई 100 मीटर इतकी होती. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात असलेला मच्छिंद्रगड सुळका चढाई करणं म्हणजे कठीण व अवघड आहे. कारण, हासुद्धा एक पारंपरिक क्लाइंब आहे. मच्छिंद्रगडावर स्वारी करायची असं पक्कं करूनच ‘मॅकविला द जंगल यार्ड’चे प्रस्तरारोहक रविवारी (दि.26) निघाले. वाट खडतर असली तरी मनात जिद्द कायम होती. मॅकमोहन म्हणाले की, मच्छिंद्रगड म्हणजे साधं-सोपं काम नाही.
सह्याद्रीतल्या सुळक्यांमधला हा एक वारसदार. एका दिवसातच मच्छिंद्रगड सर करण्याचा मानस ठेवून ‘मॅकविला द जंगल यार्ड’ या संस्थेचे चार सदस्य म्हणजेच मॅकमोहन हुले, सागर मेस्त्री, प्रणय पाटील, निलांचल गौडा निघाले. शनिवारी (दि.25) रात्री 7 वाजता मुरबाड, मग देहरी असा प्रवास करत शेवटी 8 वाजता देहरी गावात पोहोचले. इथे पाऊस होऊन गेला होता. पावसामुळे चढाई मोठी आव्हान देणारी होती. प्रस्तरारोहकांनी गोरखगड ट्रेकला सुरूवात केली. रात्री गोरखगड मध्यस्थानी असलेल्या शिव मंदिराशेजारी तंबू लावून रात्र काढून सकाळी मच्छिंद्रच्या चढाईला सुरूवात करायची होती. रात्रीचं जेवण 11 ला शिजवले, मध्यरात्री तुफान वारे सुटले, झोप काही पूर्ण झाली नाही, रात्रभर तंबू पकडून सर्व होते. पहाटे एक तास झोप आणि पावसाचा वर्षाव, पाऊस उघडताच मच्छिंद्रकडे प्रस्थान केले.
गोरखगडाच्या वाटेत असणाऱ्या शिवमंदिरापासून उजवीकडे वळणाऱ्या वाटेने मच्छिंद्राचा पायथा गाठला. रात्रीचा पावसामुळे माती चांगलीच घसरडी झाली होती. तिथे असलेल्या एका झाडाला दोर बांधून प्रणय पाटील सज्ज झाला, मच्छिंद्रगडाला नतमस्तक होऊन दगडाला हात घातला. निसरडी माती, हलणारे दगड, वारा सतत वाटे आड येत होते. वाटते एक जुनी मेख दिसली. या आधी केल्या गेलेल्या मोहिमेची ही खूण. पण तिची अवस्था फार वाईट होती. त्याच पुढे एका चीरेत नवीन मेख रोवली आणि स्वतःला सुरक्षित करून पुढे चढाई सुरु केली. अवघ्या तीस मिनिटांमध्ये सर्वांनी पहिला टप्पा पार केला होता.
पुढचा टप्पा पण तसा सोप्पा होता. पण, जास्त धोका हा दगडापेक्षा मातीवरून चालण्यात असतो. कारण, निसरडी माती कधीही पायाखालून जमीन सरकवू शकते. त्यामुळे विशेष काळजी घेतली जात होती. दुसरा टप्पा सर झाला. आत्ता मात्र पुढे कस लागणार होता. कारण पुढचा टप्पा मोठा त्यात चढाईची मार्गदेखील नीट दिसत नव्हता. पुन्हा साधारण वीस फूट उतरून खाली गेलो आणि पुढची चढाई सुरू झाली. पण, मार्ग गाठण्यासाठी 30 फूट डाव्या बाजूला निसरड्या मातीवरून सरकत गेलो. आता पुढे साठ फुटांवर प्रस्तर दिसू लागला होता. हाच शेवटचा टप्पा होता. तब्बल 50 फूट कोणतेही सुरक्षासाधन न लावता या टप्प्याची चढाई सुरु होती. इथून पडणं म्हणजे 100 फूट खाली जाणं, मोठा धोका होता. यावेळी खालून सतत मार्गदर्शन केलं जात होतं. हा कठीण टप्पा पार केला आणि एका झाडाला स्लिंग बांधून सुरक्षा दोर ओवूण घेतलं, पुन्हा सगळे वर आल्यावर आत्ता समोर होता 10 फुटी कातळ मोठी चिर, अंगावर येणारा थोडा भाग आणि खाली 300 ते 400 फूट खोल दरी. हा टप्पासुद्धा पार झाला. ‘मॅकविला’च्या शिलेदारांचं पाऊल मच्छिंद्रच्या माथ्यावर पडलं, हा सुळका सर केला. समोर गोरखगडावर असणाऱ्या गिर्यारोहकांनी एकच जल्लोष केला.
या हंगामाची सुरूवात मच्छिंद्रनाथाच्या आशीर्वादाने झाली आहे. या हंगामामधली ही पहिली मोहीम, त्यामुळे माथ्यावर पोहोचण्याचा आनंद वेगळाच होता. सगळ्यात जास्त चुका ह्या परतीच्या वेळी होतात. यशानं हुरळून न जाता काळजी घेत आम्ही वर आधीच असणाऱ्या मेखेला दोर बांधून खाली उतरायला सुरूवात केली. अशाच पद्धतीने इतर दोन टप्पे पार करत आम्ही मच्छिंद्रच्या पायथ्याला पोहोचलो.
मॅकमोहन हुले, प्रस्तरारोहक व संस्थापक, ‘मॅकविला द जंगल यार्ड’, सुधागड
- गोरखगड आणि मच्छिंद्रगड या किल्ल्यांना गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ या गुरुशिष्यांची नावे लाभली आहेत. गडाचा उपयोग हा प्रामुख्याने टेहळणीसाठी होत असावा. अजस्त्र अशा सुळक्यामुळे हे ठिकाण गिर्यारोहकांसाठी नेहमीच आकर्षण राहिले आहे. आव्हानात्मक ट्रेक आणि रॉक क्लाइंबिंग इत्यादी कारणांमुळे इतिहासाची आवड, साहस व जिद्द यांची भूक भागवण्यासाठी हे एक अप्रतिम ठिकाण आहे.







