मुद्देमाल फिर्यादीच्या ताब्यात
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील नेरळ गावातील 65 वर्षीय महिलेने बँकेतून काढलेली एक लाख नऊ हजार इतकी रक्कम मागावर असलेल्या चोरट्यांनी लंपास केली होती. त्याबाबत गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्याकडून हस्तगत केलेल्या रकमेचा धनादेश गुरुवारी कर्जत रेल्वे पोलिसांनी फिर्यादी महिलेच्या स्वाधीन केली. दरम्यान, नऊ महिन्यानंतर या गुन्ह्याची उकल होऊन मुद्देमाल फिर्यादीच्या ताब्यात देण्यात आल्याने रेल्वे पोलिसांचे कौतुक होत आहे.
नेरळ गावातील टेपआळी भागातील सुनंदा मधुकर कोकाटे या आपल्या नातींसह जुलै 2021 मध्ये नेरळ बाजारपेठ भागातील युनियन बँकेत पैसे काढण्यासाठी गेल्या होत्या.त्यांनी एक लाख नऊ हजारांची रक्कम बँकेतून काढली. दुपारच्या दरम्यान मिनीट्रेनच्या ट्रॅकवरुन घरी जाताना आरोपीने सुनंदा कोकाटे यांच्या हातातून पैशाची पिशवी खेचली आणि पळ काढला.सुनंदा कोकाटे यांनी रेल्वे पोलिसांकडे गुन्हा दाखल केला होता.
कर्जत रेल्वे पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी यादव गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण टीमकडे तपास सोपवला. या पथकात सहायक पोलीस निरीक्षक अतुल ठोंबरे तसेच पोलीस कर्मचारी पात्रले, ठाकूर, पठाण, तुरडे, शेटे, पेरणेकर यांच्या पथकाने ही कामगिरी चोख बजावली.