आयईएसपीच्या पहिल्या बॅचचे यशस्वी लँडिंग

सात विद्यार्थ्यांची नवी मुंबई विमानतळावर निवड; हजारो तरुणांना प्रशिक्षित करण्याचे उद्दिष्ट

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यातील तरुणांना कौशल्याधारित प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने कार्यरत असलेल्या आयईएसपी (इन्स्टिट्यूट फॉर एक्सलन्स इन सर्व्हिसेस अँड प्लॅनिंग) अलिबागच्या पहिल्या बॅचमधील सात विद्यार्थ्यांची नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ग्राऊंड स्टाफ पदांसाठी निवड झाली आहे. या यशामुळे संस्थेच्या प्रशिक्षण उपक्रमाला प्रोत्साहन मिळाले असून, स्थानिक तरुणांसाठी विमान वाहतूक क्षेत्रातील रोजगाराची नवी दारे खुली झाली आहेत.

या निवड झालेल्या सात विद्यार्थ्यांमध्ये सहर्ष पाटील, प्रांजली प्रसाद, ऐश्वर्या देसाई, नेहा पाटील, भूषण टक्के, यश सरतांडेल आणि गौतमी साळुंखे यांचा समावेश आहे. त्यांचा गौरव करण्यासाठी विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक तसेच पीएनपी एज्युकेशन सोसायटी आणि आयईएसपीच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे विद्यार्थ्यांचा सत्कार केला. पहिल्याच बॅचमधील सात विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळाल्याने विद्यार्थी, पालक आणि संस्थेच्या प्रतिनिधींमध्ये आनंदाचे वातावरण होते.

यावेळी आयईएसपीचे संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी गॅरी खन्ना यांनी संस्थेच्या आगामी नियोजनाची माहिती दिली. ते म्हणाले की, येत्या तीन ते चार वर्षांत रायगड जिल्ह्यातील सुमारे पाच हजार तरुणांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे संस्थेचे उद्दिष्ट आहे. एअरावत ग्रुप आणि पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या सहकार्याने कार्यरत असलेल्या आयईएसपीच्या माध्यमातून विमानतळ व्यवस्थापन, विमान वाहतूक, हॉस्पिटॅलिटी, ग्राहक सेवा आणि इतर सेवा क्षेत्रांशी संबंधित प्रशिक्षण दिले जाते. उद्योगक्षेत्राच्या गरजांनुसार विद्यार्थ्यांना कौशल्यसंपन्न करून रोजगारासाठी तयार करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिल्या बॅचमधील सात विद्यार्थ्यांची झालेली निवड ही या उपक्रमातील महत्त्वाची सुरुवात मानली जात आहे. स्थानिक पातळीवर प्रशिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देत तरुणांना रोजगारक्षम बनविण्याच्या प्रयत्नांमुळे रायगडमधील युवकांना नव्या क्षेत्रांत करिअर घडविण्याची संधी मिळत आहे. आगामी काळात अधिकाधिक तरुणांना प्रशिक्षण देऊन रोजगाराशी जोडण्याचे आव्हान आणि उद्दिष्ट आयईएसपीसमोर आहे, असे गॅरी खन्ना यांनी सांगितले.

कौशल्य प्रशिक्षणातून रोजगाराच्या संधी : चित्रलेखा पाटील
रायगड जिल्ह्यातील बेरोजगारीचा प्रश्न अधोरेखित करताना पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या कार्यवाह चित्रलेखा पाटील म्हणाल्या की, बेरोजगारी ही जिल्ह्यासमोरील महत्त्वाची समस्या आहे. पाटील कुटुंबियांच्या माध्यमातून विविध संस्थांच्या सहकार्याने आजवर रायगड जिल्ह्यातील हजारो तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. बदलत्या काळानुसार रोजगाराच्या संधींचे स्वरूपही बदलत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पारंपरिक शिक्षणाबरोबरच विविध कौशल्याधारित अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. ही गरज लक्षात घेऊन आयईएसपीसारख्या संस्थेच्या माध्यमातून विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. पीएनपी एज्युकेशन सोसायटी आणि आयईएसपीच्या सहकार्याने विमान वाहतूक व संबंधित सेवा क्षेत्रांत पहिल्याच बॅचमधील सात विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी मिळाली, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे, असे त्यांनी सांगितले.

रायगड जिल्ह्यातील तरुणांमध्ये प्रचंड क्षमता आहे. त्यांना योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि आवश्यक कौशल्ये मिळाल्यास विमान वाहतूक क्षेत्रासह वेगाने विकसित होणाऱ्या विविध सेवा क्षेत्रांत रोजगार मिळवण्याच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. स्थानिक तरुणांच्या कौशल्याला प्रत्यक्ष रोजगाराच्या संधींशी जोडण्यावर आमचा विशेष भर आहे.

गॅरी खन्ना
आयईएसपीचे संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी
Exit mobile version