जेएनपीएबरोबरची बैठक सफल

माजी आमदार मनोहर भोईर यांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट


| उरण | वार्ताहर |

जेएनपीए उपाध्यक्ष उन्मेश वाघ यांच्या सोबत नवीन शेवा गावातील प्रलंबित प्रश्नांवर नुकतीच बैठक संपन्न झाली. माजी आमदार मनोहर भोईर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जेएनपीएचे उपाध्यक्ष उन्मेश वाघ यांची भेट घेतली. या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा होऊन विविध मागण्या मान्य करण्यात आल्या. नवीन शेवा गावाच्या पुनर्वसनाचे जटील प्रश्न, वाढीव गावठाण, नोकऱ्या व नागरी सुविधा बाबत बैठकित चर्चा करण्यात आली. बैठकीमध्ये पाण्याच्या बीलाचा प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहे. शेवा गावचे पुनर्वसन करताना पाण्याचे बील जेएनपीटी भरत होती, परंतु सध्या ते भरत नाही. या मुद्द्यावर वाघ यांनी सांगितले की, पाण्याच्या बिलाबाबत आम्ही तत्वतः मान्यता देतो, तसेच जेएनपीएकडून नवीन शेवा गावाला टॅक्स मिळेल. त्यावेळी हे पैसे आम्ही कापून घेऊ, परंतु हा मुद्दा आम्ही बोर्ड मीटिंगमध्ये घेऊन याच्यावर चर्चा करून निर्णय देऊ असे सांगितले.

तसेच जेएनपीटी ने 33 : 64 : 05 हेक्टर जमीनीचे पैसे सिडकोला नवीन शेवा गावाच्या पुनर्वसनासाठी दिले होते. याबाबत सिडकोबरोबर बैठक लावून हा प्रश्न सोडवला जाईल असे मान्य केले. जेएनपीटीने 36 वर्षांपूर्वी नवीन शेवा गावचे पुनर्वसन केले होते. त्यावेळी रस्ते, गटारे हि कामे केली होती, परंतु आता इतक्या वर्षानंतर रस्ते व गटारांची व इतर नागरी सुविधांची कामे जेएनपीएकडून केली जात नाहीत. त्यासाठी जेएनपीएकडून दहा कोटी रुपये हे रस्ते, गटारे व नागरी सुविधांसाठी देण्याचे त्यांनी मान्य केले. त्याचबरोबर पुनर्वसीत नवीन शेवा गावातील तरुणांना नोकरीमध्ये प्राधान्य दिले जाईल, असेही त्यांनी आश्वासन दिले. नवीन शेवा ग्रामपंचायतीला अन्य कोणत्या मार्गाने उत्पन नसल्यामुळे साफसफाईसाठी चार कामगार देण्याचेही त्यांनी मान्य केले. या सर्व प्रश्नांवर जेएनपीएने सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल माजी आमदार मनोहर भोईर यांनी उपाध्यक्ष वाघ यांचे आभार मानले.

सदर बैठकीला जेएनपीटीच्या व्यवस्थापक मनीषा जाधव, उपव्यवस्थापक पगारे, यांच्यासह अन्य अधिकारी, नवीन शेवा गावच्या सरपंच सोनल घरत, गावचे अध्यक्ष कमळाकर पाटील, उपसरपंच कुंदन भोईर, ग्रामपंचायत सदस्य भूपेंद्र पाटील, मयुरी घरत, वैशाली म्हात्रे, भावना भोईर, रेखा म्हात्रे, महेश म्हात्रे, निलेश घरत आदी उपस्थित होते.

Exit mobile version