| अलिबाग | प्रतिनिधी |
अलिबाग तालुक्यातील चेंढरे येथील रणरागिणी महिला गोविंदा पथकाने अलिबागसह चार ठिकाणी दहीहंडीच्या सोहळ्यात सहभाग घेऊन सलामीचे थर यशस्वीपणे लावून बहुमान मिळविला. प्रथमच सुरु झालेल्या या रणरागिणी गोविंदा महिला पथकाची यशस्वी कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे.
अलिबाग तालुक्यातील चेंढरे येथे पहिल्यांदाच रणरागिणी गोविंदा पथक सुरु करण्यात आले. शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, शेकाप तालुका महिला आघाडी सदस्या नागेश्वरी हेमाडे यांच्या माध्यमातून हे पथक तयार करण्यात आले होते.
या पथकाला चित्रलेखा पाटील यांच्या हस्ते टी-शर्ट वाटप करण्यात आले. गुरुवारी अलिबाग तालुक्यात ठिकठिकाणी दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम झाला. शेतकरी कामगार पक्ष सुमन पाटील व सवाई पाटील, शेकाप पुरस्कृत प्रशांत नाईक मित्रमंडळ, भारतीय जनता पार्टी आयोजित दहीहंडी उत्सवात रणरागिणी महिला गोविंदा पथकाने सहभाग घेतल्याची माहिती नागेश्वरी हेमाडे यांनी दिली.