पन्नास रुग्णांची यशस्वी प्लास्टीक सर्जरी

। अलिबाग । प्रतिनिधी ।

रायगड मेडिकल असोसिएशन, जिल्हा रुग्णालय अलिबाग-रायगड व चित्पावन आठवले फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टीक सर्जरीचा उपक्रम अलिबागमध्ये पहिल्यांदाच राबविला. या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला असून मुंबई व पुणे येथील तज्ञ व अनुभवी डॉक्टरांनी पन्नास गरजू रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्यांची प्लास्टीक सर्जरी केली.

या शिबिराचे उदघाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांच्या हस्ते झाले. यावेळी समन्वयक जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. शीतल जोशी- घुगे, डॉ. नितीन मोकल व त्यांची प्लास्टिक सर्जरी डॉक्टरांची टीम, डॉ. स्वप्ना आठवले व त्यांच्या टीम मधील डॉक्टर्स, डॉ. रविंद्र म्हात्रे, डॉ. एस. एन. तिवारी, डॉ. प्रशांत जन्नावार, डॉ. अपूर्वा कुलकर्णी, डॉ. राजाराम हुलवान, डॉ. संदेश म्हात्रे, डॉ. चंद्रकांत वाजे, डॉ. घाटे, डॉ. विनायक पाटील, डॉ. प्रणाली पाटील, डॉ. संजीव शेटकार, डॉ. संजय पाटील, श्‍वेता म्हात्रे, गायत्री म्हात्रे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, दिलीप जैन, परिचारिका, रुग्ण व त्यांचे नातेवाईक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच, उदघाटनाच्या या कार्यक्रमात असोसिएशनचे पदाधिकारी अध्यक्ष डॉ. निशिगंध आठवले यांनी असोसिएशन तर्फे सर्व निमंत्रितांचे स्वागत केले. या प्लास्टिक सर्जरी कॅम्प व्यतिरिक्त सरकारी यंत्रणेची मदत घेऊन जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत त्या त्या तालुक्यातील रायगड मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर्स सोबतीला घेऊन मेडिकल चेक अप कॅम्प घेण्याची व्यवस्था आम्ही करु, असे डॉ. आठवले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.

ज्येष्ठ प्लास्टिक सर्जन डॉ. नितीन मोकल, डॉ. स्वप्ना आठवले व त्यांचे सहकारी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अंबादास देवमाने व अलिबाग येथील सर्जन, भुलतज्ञ, भिषक, बालरोगतज्ञ, जिल्हा रुग्णालयातील परिचारिका व इतर कर्मचारी यांच्या सहकार्याने हा शिबीर पार पडला. भाजल्यानंतरचे व्रण, अतिरिक्त बोटं, जन्मतःच असणारी ओठातील भेग, जिभेखाली असणार्‍या नसांच्या अडचणी, मस यासारख्या विविध विकारांवर शस्त्रक्रियेद्वारे उपचार झाले.

भाजलेली व्यक्ती अथवा अन्य त्वचेचे आजार असलेल्या रूग्णांवर पूर्वी मुंबई-पुणेसारख्या मोठ्या शहरात उपचार केले जात होते. मात्र, अलिबागमध्ये राबविलेल्या या नाविन्य उपक्रमातून भाजल्यानंतरचे व्रण व इतर त्वचेच्या आजार असलेल्या रूग्णांना प्लास्टिक सर्जरी एक आधार बनला आहे. 
Exit mobile version