महाड | वार्ताहर |
रायगड किल्ल्यावर दोन जूनला तिथीनुसार तर सहा जूनला तारखेनुसार शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा होत आहे. यंदा शिवराज्याभिषेकाचे 350 वे वर्ष असल्याने मोठ्या संख्येने शिवप्रेमी किल्ल्यावर दाखल होणार आहेत. सोहळ्याला कोणतेही गालबोट लागू नये, याकरिता प्रशासन सज्ज झाले असून अधिकाऱ्यांनी रायगड गडावरील तयारीचा आढावा घेण्यासाठी प्रत्यक्ष पाहणी केली.
शिवप्रेमींसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा, वाहनतळ, रायगडावर येण्यासाठी एसटी वाहतुकीबाबत नियोजन, स्वच्छतागृहे, रायगड रोप वे, गडावरील सुरळीत वीज पुरवठा, आपत्ती व्यवस्थापन, पोलिस सुरक्षा व्यवस्था अशा विषयांचा या वेळी आढावा घेण्यात आला. अधिकारी वर्गाने गडावर जाऊन तयारीचा आढावा घेतला. आढावा बैठकीला जिल्हाधिकारी योगेश म्हस्के, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर अधीक्षक अतुल झेंडे, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के पाटील, महाडच्या प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार सुरेश काशीद तसेच शिवराज्याभिषेक समिती व कोकणकडा मित्र मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.