| महाड | वार्ताहर |
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची जाहीर सभा महाडमध्ये येत्या 6 मे रोजी आयोजित करण्यात आली आहे. या सभेची महाडमध्ये जय्य्त तयारी सुरु आहे. या सभेतून उद्धव ठाकरे यांच्यासह सुषमा अंधारे आणि भास्कर जाधव स्थानिक शिंदे गटाचा कशा पद्धतीने समाचार घेणार याची आतुरता महाडकरांना लागली आहे. या जाहीर सभेस नागरिकांना उपस्थित राहता येऊ नये याकरिता पुरेपूर प्रयत्न स्थानिक आमदार करत असल्याचा आरोप यावेळी जिल्हाप्रमुख अनिल नवगुणे यांनी केला आहे.
या सभेस उद्धव ठाकरे हे मार्गदर्शन करणार असून यांच्या समवेत सुभाष देसाई, सुषमा अंधारे, भास्कर जाधव, अनंत गीते हे देखील उपस्थित राहत आहेत. जागेची क्षमता पाहता शहरात देखील स्क्रीनच्या माध्यमातून लोकांना हि सभा पाहता येणार आहे. या सभेत महाडमधील स्व. माणिक जगताप यांच्या कन्या आणि भाऊ यांच्यासह हजारो काँग्रेस कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहेत. याबाबत बोलताना त्यांनी या पक्ष प्रवेशामुळे पक्षाची ताकत वाढणार असून भविष्यात गद्दार लोकांना चोख उत्तर दिले जाईल असे नवगुणे यांनी स्पष्ट केले. या सभेला तुफान गर्दी होणार आहे असेही बोलले जात आहे.