। मुंबई । प्रतिनिधी ।
भारताचा स्टार वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर याच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. याबद्दल त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे. शार्दुल ठाकूरच्या उजव्या पायाच्या घोट्याची लंडनमध्ये शस्त्रक्रिया झाली आहे. शार्दुलने शस्त्रक्रियेनंतरचा फोटो शेअर केला असून त्याला कॅप्शन दिले आहे की, यशस्वी शस्त्रक्रिया जून 2024 वि. मे 2019. खरंतर 2019 मध्येही शार्दुलला शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले होते.
यावर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिका दौर्यावेळी शार्दुलच्या दुखापतीने डोके वर काढले होते. पण त्यानंतरही त्याने खेळणे मॅनेज केले होते. त्याने मुंबईला 42 व्यांदा रणजी ट्रॉफी जिंकून देण्यात मोलाचा वाटाही उचलला होता. तसेच, तो आयपीएल 2024 मध्येही चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला. दरम्यान, आयपीएलनंतर पुन्हा देशांतर्गत क्रिकेटचा हंगाम सुरू होण्यासाठी तीन महिन्याचा कालावधी आहे. सप्टेंबरमध्ये भारतातील देशांतर्गत क्रिकेटचा नवा हंगाम सुरू होईल. त्यामुळे तोपर्यंत शार्दुलला विश्रांतीची संधी आहे. त्याला या दुखापतीतून बाहेर येण्यासाठी साधारण तीन महिन्यांचा काळ लागण्याची शक्यता आले. त्यामुळे तो सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान पुन्हा क्रिकेट खेळताना दिसू शकतो. पण त्याच्या पुनरागमनाबाबत अद्याप कोणाकडूनही अधिकृत भाष्य करण्यात आलेले नाही.







