असे गिदी पुन्हा होणे नाहीत

पंडित पाटील यांचे भावूक उद्गार
| आगरदांडा | वार्ताहर |
शेकापचे ज्येष्ठ नेते कृष्णा गिदी म्हणजे एकनिष्ठ नेता, शांत स्वभाव व कधीही कोणावर न चिडता लोकांना आपलेसे करून घेण्यात गिदी साहेबांचा हातखण्डा होता. कार्यकर्ता कसा असावा हे त्यांच्या कडून शिकण्यासारखे होते.त्यांच्यामुळेच मुरुड तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाने उभारी घेतली होती. त्यांच्या सारखा कार्यकर्ता पुन्हा होणे नाही असे भावपूर्ण प्रतिपादन माजी आ.पंडित पाटील यांनी केले आहे. राजपुरी येथील शेकापचेे जेष्ठ नेते कृष्णा बाळोजी गिदी यांचे वयाच्या 89 व्य वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. यावेळी राजपुरी येथील महादेव कोळी समाज यांच्यावतीने शोकसभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

या शोकसभेला भाजपचे महाराष्ट्र मच्छिमार सेलचे अध्यक्ष अ‍ॅड. चेतन पाटील, हनुमान मच्छिमार सेलचे चेअरमन पांडुरंग आगरकर, प्रकाश सरपाटील, शेकाप तालुका चिटणीस अजित कासार, जिल्हा सहचिटणीस मनोज भगत, प्रमोद भायदे, तुकाराम पाटील, भरत बेलोसे, नगरसेवक पांडुरंग आरेकर, आदी मान्यवर उपस्थित होते. पंडित पाटील यांनी सांगितले की. कै.दत्ता पाटील, कै.प्रभाकर पाटील यांच्या सोबत काम करून गिदी यांनी मुरुड तालुक्याचा विकास करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. मोतीराम पाटील व गिदी गेल्यामुळे पक्षाची मोठी हानी झाली आहे. राजपुरी जेट्टी मंजूर करण्यासाठी गिदी यांचा पाठपुरावा होता. त्यांचे कार्य येथील जनता कधीही विसरणार नाही असे यावेळी त्यांनी प्रतिपादन केले. अ‍ॅड. चेतन पाटील, नगरसेवक प्रमोद भायद यांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केल्या.

Exit mobile version