| खांब | प्रतिनिधी |
गेल्या चार ते पाच वर्षांपासून चिंचवली गावाला पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या भेडसावत होती. या समस्येकडे सुदर्शन केमिकल्स कंपनी धाटाव या कंपनीने गंभीर दखल घेऊन येथील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवून महिला वर्गाला दिलासा मिळवून दिला आहे.
गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीवरून महिलांना डोक्यावर पाणी आणावे लागत असे, तर पावसाळ्यात विहिरीपर्यंत जाणे धोकादायक ठरत असे या परिस्थितीने ग्रामस्थ त्रस्त झाले होते. या समस्येवर उपाय म्हणून भिम सेवा संघ चिंचवली, माता रमाई महिला मंडळ आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन लोकवर्गणीतून बोअरवेल मारली. परंतु, बोअर पंप व फिटिंगची गरज असल्याने आर्थिक अडचण निर्माण झाली. याच वेळी सुदर्शन केमिकल कंपनीच्या सीएसआर विभागाने मदतीचा हात पुढे करून. गावाच्या बोअरपंप बसवणी व फिटिंगचा खर्च उचलला, ज्यामुळे चिंचवलीच्या पाणी समस्येचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला. कंपनीचा हा सामाजिक उपक्रम गावासाठी आशेचा किरण ठरला असून, ग्रामस्थांनी याबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली. या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सीएसआर प्रमुख माधुरी सणस मॅडम, तसेच महेश डेरिया, अमर चांदणे, संग्राम पाटील, रवी दिघे, महेश बामुगडे यांची उपस्थिती उल्लेखनीय ठरली. अध्यक्ष प्रमोद जाधव, उपाध्यक्ष गोपाळ कांबळे, तसेच भिम सेवा संघ चिंचवली, मुंबई कमिटी व माता रमाई महिला मंडळ यांनी संपूर्ण व्यवस्थापन सांभाळले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रितम जाधव यांनी केले, तर किरण कांबळे यांनी आभार व्यक्त केले. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, सुदर्शन केमिकलने केलेले हे कार्य आम्हाला नवीन जीवन देणारे आहे. आता महिलांना दररोजचा त्रास कमी झाला असून, सुरक्षित आणि स्वच्छ पाण्याचा स्रोत उपलब्ध झाला आहे.







